रिक्षाबंदकडे डोंबिवलीकरांची पाठ
By Admin | Updated: February 14, 2015 22:38 IST2015-02-14T22:38:08+5:302015-02-14T22:38:08+5:30
भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईच्या विरोधात शुक्रवारी सायंकाळी रिक्षाचालकांनी अचानक रिक्षाबंद आंदोलन छेडले होते़

रिक्षाबंदकडे डोंबिवलीकरांची पाठ
डोंबिवली : भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईच्या विरोधात शुक्रवारी सायंकाळी रिक्षाचालकांनी अचानक रिक्षाबंद आंदोलन छेडले होते़ शनिवारीही दिवसभर शहरात तुरळक प्रमाणात रिक्षा रस्त्यावर आढळून आल्या. मात्र, त्यांच्या आंदोलनाला कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधींनी समर्थन न केल्याने या आंदोलनाची हवा गळून गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
शुक्रवारच्या आंदोलनामुळे सायंकाळी घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले़ मात्र, कारवाईचे कारण योग्यच असल्याने नागरिकांचीही त्यास मूकसंमती असल्याचे दिसून आले़ त्यामुळे शनिवारी फारशा रिक्षा दिसल्या नसल्या तरीही प्रवाशांनी त्याचा फारसा त्रागा केला नाही.
रिक्षाचालकांकडून सातत्याने भाडे नाकारले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून वाहतूक शाखेकडे आल्या होत्या. बुधवारी कल्याणमध्ये आलेल्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी अशा रिक्षाचालकांविरोधात धडक कारवाईचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले होते. त्यानुसार, गुरुवारपासून या कारवाईला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी वाहतूक पोलिसांनी ९६९ चालकांकडून दोन लाखांहून अधिक दंड वसूल केला. शनिवारच्या कारवाईची आकडेवारी संध्याकाळपर्यंत समजू शकलेली नसली तरीही कारवाई मात्र करण्यात आल्याचे आरटीओ अधिकारी एम. सरक यांनी सांगितले.
सरप्राइज कारवाई सुरूच राहणार
आरटीओ विभागाची ही कारवाई सलग सुरू राहणार नसली तरीही सरप्राइज कारवाई सुरूच राहणार असल्याचेही आरटीओने स्पष्ट केले. बँज नसणे, कागदपत्रे नसणे, युनिफॉर्म नसणे यासह भाडे नाकारणे आदी कारणांमुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे अवैध रिक्षाचालकांना आळा बसेल, असा विश्वासही नागरिकांसह पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला.
आंदोलनामुळे नागरिकांचे ‘कल्याण’!
अनिकेत घमंडी ल्ल कल्याण
येथील आरटीओ कारवाईच्या निषेधार्थ कल्याणमधील रिक्षाचालकांनी एकवटून त्यांनी अचानकपणे शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी दिवसभर रिक्षाबंदच पुकारला. त्यामुळे कल्याणकरांना काहीसा त्रास झाला असला तरीही या आंदोलनामुळे प्रवाशांचे तब्बल २५ लाखांनी उत्पन्न वाचल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यातच नागरिकांच्या हितासाठी कधीही आवाज न उठविणारे रिक्षाचालक एकत्र आल्याने ही सुविधा प्रवाशांसाठी आहे की, केवळ स्वार्थ साधण्यासाठी, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
चालकानेच दिलेल्या माहितीनुसार बहुतांशी रिक्षाचालक दिवसाला सुमारे ७०० हून अधिक रुपयांची उलाढाल करतो़ तर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल ४ हजार परमिटधारक रिक्षा रस्त्यावर आहेत़ साधारणत: हजारांच्या संख्येत अनधिकृत रिक्षाही रस्त्यावर धावत असल्याचे युनियन नेत्यांनीच आरटीओला सांगितल्याचेही सांगण्यात आले. परमिटधारक रिक्षांचाच विचार केल्यास दिवसभरात त्यांच्याकडून सुमारे २८ लाखांची उलाढाल होत असते. शनिवारच्या दिवसभरात सुमारे २५ टक्केच रिक्षा रस्त्यावर होत्या. त्या रिक्षांचा व्यवसायवगळता कल्याणकरांचे तब्बल २५ लाखांहून अधिक उत्पन्न वाचल्याचे स्पष्ट होत आहे.
पादचारी सुखावले !
काहीशाच रिक्षा रस्त्यावर असल्याने पादचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. एरव्ही, अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करून मार्ग काढावा लागतो़ तुलनेने शनिवारी कोंडी कमी असल्याने नागरिक समाधानी होते. विशेषत: शिवाजी चौक, बाजारपेठ, स्टेशन रोड आदी ठिकाणी कोंडीने मोकळा श्वास घेतल्याचे स्पष्टपणे दिसून आले.