जुलै महिन्यात दशकातील कमी पाऊस!
By Admin | Updated: July 29, 2015 02:18 IST2015-07-29T02:18:55+5:302015-07-29T02:18:55+5:30
जून महिन्यात लांबलेला पाऊस जुलै महिन्यात तरी दमदार कोसळेल, अशी शक्यता असताना प्रत्यक्षात जुलै महिन्यातही गेल्या १० वर्षांतील सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे.

जुलै महिन्यात दशकातील कमी पाऊस!
मुंबई : जून महिन्यात लांबलेला पाऊस जुलै महिन्यात तरी दमदार कोसळेल, अशी शक्यता असताना प्रत्यक्षात जुलै महिन्यातही गेल्या १० वर्षांतील सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात मुंबईत सरासरी ८०० मिलिमीटर पावसाची नोंद होते. या वर्षी मात्र हवामानातील बदलाने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींमुळे मुंबईत २६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.
जुलै हा सर्वाधिक पावसाचा महिना म्हणून ओळखला जातो. जून महिन्याच्या शेवटी मुंबईत पावसाची १ हजार मिलिमीटर एवढी नोंद झाल्यानंतर जुलै महिन्यातही पाऊस सरासरी ओलांडेल, असा अंदाज होता. मात्र ८०० मिलिमीटच्या तुलनेत २६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने ही मासिक सरासरी पावसाच्या ६७ टक्क्यांनी कमी असल्याचे स्कायमेटचे म्हणणे आहे.
अधून-मधून कोसळणाऱ्या सरींमुळे जुलै महिना कोरडाच गेल्याचा दावा संस्थेने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे जुलै महिन्याचे सुरुवातीचे २० दिवस मुंबईकरांसाठी कोरडे गेलेच. परिणामी, मुंबईकरांना उष्णतेसह उकाड्याचा सामना करावा लागला. हलक्या सरींमुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली होती.
२००५ साली जुलै महिन्यात मुंबईत १ हजार ४५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षीही मुंबईत जुलै महिन्यात १ हजार ४६८ पावसाची नोंद झाली होती. या वर्षी मात्र जुलै महिन्यात बंगालच्या उपसागरात पावसाळी हवामान सक्रिय झाले नाही.
या कारणात्सव मुंबईत अपेक्षित पाऊस झाला नाही, असेही संस्थेने म्हटले आहे. (प्रतिनिधी)
येत्या ४८ तासांत उत्तर कोकणाच्या किनाऱ्याच्या किनाऱ्यालगतच्या भागात आणि गुजरात किनारपट्टीवर ताशी ४५-५५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे या काळात समुद्र खवळलेला राहील. परिणामी, या काळात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.