तलावांमध्ये ११ टक्के जलसाठा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST2021-09-02T04:11:34+5:302021-09-02T04:11:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे चार तलाव भरून वाहू लागले. मात्र, ऑगस्ट महिन्यात ...

Less than 11% water storage in lakes | तलावांमध्ये ११ टक्के जलसाठा कमी

तलावांमध्ये ११ टक्के जलसाठा कमी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे चार तलाव भरून वाहू लागले. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने जोर धरला नाही. त्यामुळे वर्षभराचा पाणी प्रश्न मिटण्यासाठी सुमारे पावणेदोन लाख दशलक्ष लिटर जलसाठा कमी पडत आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचे संकेत हवामान खात्याने वर्तविले असल्याने पालिका आशावादी आहे. अन्यथा मुंबईकरांना भविष्यात पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात १७ जुलैपर्यंत जेमतेम १७ टक्के जलसाठा जमा होता. त्यामुळे पाणीकपात लागू करण्याची तयारी सुरू होती. मात्र, त्यानंतर झालेल्या पावसामुळे तलावांतील जलसाठ्यात मोठी वाढ झाली. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडत असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये दिसून आले आहे. मात्र, गेल्या महिनाभरात पावसाचा जोर दिसून आला नाही.

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, महिनाभरापासून तलाव क्षेत्रात तुरळक पाऊस पडत आहे. सध्या १२ लाख ७६ हजार जलसाठा जमा आहे. तर वर्षभर मुंबईत सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमीच असल्याने पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तलावांतील जलसाठ्याचा आढावा घेण्यात येत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे तलाव क्षेत्रात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

३१ ऑगस्ट २०२१ रोजी

जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)

तलाव कमाल किमान उपायुक्त साठा (दशलक्ष) सध्या

मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १०९६५६ १६०.७८

तानसा १२८.६३ ११८.८७ १४३४७५ १२८.५४

विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.१७

तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०११ १३९.१५

अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ १७४९९९ ६०१.९०

भातसा १४२.०७ १०४.९० ६३०७३७ १३८.८७

मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १८१८०१ २८२.९५

वर्ष जलसाठा (दशलक्ष लिटर) टक्के

२०२१ - १२७६३७७ ८८.१९

२०२० - १३९२९९६ ९६.२४

२०१९- १३९७२९९ ९६.५४

Web Title: Less than 11% water storage in lakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.