जिल्ह्यात ७ जणांना लेप्टो
By Admin | Updated: August 8, 2014 00:42 IST2014-08-07T21:55:07+5:302014-08-08T00:42:57+5:30
प्रतिबंधात्मक उपचार : नऊशे सहवासीतांवर उपचार

जिल्ह्यात ७ जणांना लेप्टो
रत्नागिरी : जिल्ह्यात लेप्टोचे सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने तत्काळ रुग्णांच्या ९०० सहवासीतांवर प्रतिबंधात्मक उपचार सुरू केले आहेत.
लेप्टोस्पायरोसिस हा रोग बाधित प्राणी उंदीर, डुक्कर, गाई, म्हशी व कुत्री यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. हे जंतू एक वर्षापर्यंत लघवीतून बाहेर पडतात. काही प्राण्यांत आयुष्यभर हे जंतू शरीरात राहतात. या प्राण्यांच्या लघवीचे दूषित पाणी, माती, भाज्या यांचा माणसांच्या त्वचेशी संपर्क आल्यास हा रोग होतो. मागील चार वर्षांत जिल्ह्यात लेप्टोचे ३४६ रुग्ण आढळून आले.
आरोग्य विभागाकडून लेप्टोबाबत घ्यावयाची काळजी यावर जोरदार प्रचार, प्रसार मोहीम राबविण्यात येत आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर लावणीची कामे सुरू होती. ती संपुष्टात आल्यानंतर लेप्टोने जिल्ह्यात डोके वर काढल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे.रत्नागिरी शहरातील बेलबाग येथे नबीसार हट्टी (३६) हा रुग्ण सापडला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत. तसेच सखाराम रत्नू येझरे (६५, खेडशी, रत्नागिरी), सरिता सदाशिव करंजकर (कोंढे, चिपळूण), सुगंधा शिवाजी घडशी (४५, पालवण, चिपळूण), करिश्मा अशोक सारंग (२०, गुहागर), बापू पांडुरंग पिंगळे (४०, मुर्शी, संगमेश्वर), रवींद्र गंगाराम कांबळे (५०, भडकंबा, संगमेश्वर) हे रुग्ण सापडले असून, त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणाही होत आहे.
या रुग्णांना लेप्टो झाल्याचे स्पष्ट होताच आरोग्य विभागाने रुग्णांच्या सहवासात आलेल्या ९०० लोकांवर प्रतिबंधात्मक उपचार केले. त्यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ रुग्णांच्या गावांमध्ये लेप्टोबाबतचे सर्वेक्षण सुरु केले आहे.
ज्या ठिकाणी लेप्टोचे रुग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी लेप्टोबाबत जनजागृती सुरू आहे. त्याचबरोबर त्या गावांवर आरोग्य विभागाने लक्ष दिले आहे. या परिसरात आरोग्य विभागाचे कर्मचारी विशेष लक्ष ठेऊन आहेत.
लेप्टोबाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेला औषधसाठा, डॉक्सीन सायक्लिन आदी पुरेसा साठा आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर लेप्टोच्या संशयित रुग्णाकडे जातीने लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लेप्टोबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे. (शहर वार्ताहर)