Join us  

पावसात पायपीट केल्यास लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता; रहा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 3:37 AM

महापालिकेचे आवाहन; ७२ तासांत औषधोपचार करणे आवश्यक

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. ज्या नागरिकांचा या पावसाच्या पाण्याशी संबंध आला, तसेच ज्या व्यक्ती गमबूट वापरण्यासारखी खबरदारी न घेता पावसाच्या पाण्यातून चालत गेल्या, त्यांना लेप्टोचा संसर्ग होण्याची भीती आहे. याचप्रमाणे जखम, जखमा, खरचटलेला भाग असलेल्या ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संबंध आला असेल, अशांना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.

पावसाच्या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे, असे महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले. व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल; अथवा साधे खरचटलेले जरी असेल तरी अशा छोट्याशा जखमेतूनसुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असे आवाहन डॉ. केसकर यांनी केले आहे.अशी होते लेप्टोची लागणअतिवृष्टीदरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाच्या ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादुर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या मूत्रातून लेप्टोचे सूक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात संसर्गित होतात. बाधित झालेल्या पाण्याशी माणसाचा संबंध आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते.

टॅग्स :मुंबईपाऊस