Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत लेप्टोचे रुग्ण दोन वर्षात घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:44 IST

मुंबई : मुंबईत २९ आॅगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसात जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे मुंबई महापालिकेला टीकेचे धनी व्हावे लागले. २००५पासून आजतागायत काहीच सुधारणा झाली नाही, अशी तीव्र प्रतिक्रियाही उमटली. मात्र हे आरोप जिव्हारी लागलेल्या महापालिकेने आपल्या कामाचा अहवाल मांडण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात भर पावसात अधिकारी रस्त्यावर कार्यरत होते. त्यामुळेच पुन्हा पाणी तुंबले नाही, याचे श्रेय घेतल्यानंतर आता लेप्टोस्पायरोसिसची रुग्णसंख्या कमी झाली असल्याचा दावा पालिकेने केला आहे.२६ जुलै २००५च्या पावसानंतर मुंबईत लेप्टोचे १ हजार ४४६ रुग्ण आढळून आले होते, तर ११९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र २९ आॅगस्ट २०१७च्या अतिवृष्टीनंतर जनजागृतीसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य मोहीम राबविली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे आयोजित करून प्रतिबंधात्मक गोळ्यांचेही वाटप करण्यात आले.या सर्व मोहिमेला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने ही मोहीम प्रभावी ठरली असल्याचा दावा महापालिकेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केला आहे. या वर्षी ३० सप्टेंबरपर्यंत लेप्टोचे २१२ रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.२९ आॅगस्ट व १९ सप्टेंबर २०१७ रोजी झालेल्या मुसळधार पावसात बºयाच ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे नागरिकांना पावसाच्या पाण्यामधून चालावे लागले. पावसाच्या पाण्याशी संबंध आलेल्या व्यक्तींना लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपचारांबाबतची माहिती आरोग्य खात्याने एसएमएसद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवली. तसेच १७३ आरोग्य शिबिरे, २० लाख ८६ हजार ३०७ घरांपर्यंत पोहोचणे व ९३ लाख ५६ हजार ६९४ लोकांचे प्रतिबंधात्मक सर्वेक्षण करण्यात आले.तसेच ४ लाख ६४ हजार ८५४ डॉक्सीसायक्लीन या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.लेप्टो म्हणजे काय?लेप्टोस्पायरोसिस हा रोग लेप्टोस्पायरा (स्पायराकिटस) या सूक्ष्म जंतूमुळे होतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी, बैल तसेच इतर काही प्राणी या रोगाचे स्रोत आहेत. बाधित प्राण्यांच्या लघवीद्वारे संसर्गित झालेल्या पाण्याशी संबंध येताच मनुष्याला लेप्टोस्पायरोसिस या रोगाची बाधा होऊ शकते. निरनिराळ्या प्रकारची जनावरे सदर सूक्ष्मजंतूंचे वाहक असतात. पण त्यांच्यात सदर रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत. मनुष्यापासून मनुष्याला या संसर्गाची बाधा होत नाही. शहरी विभागात लेप्टोस्पायरा हे सूक्ष्मजंतू उंदीर, कुत्रे इत्यादी प्राण्यांमध्ये आढळतात. संसर्गित जनावरांच्या मूत्राद्वारे दूषित झालेले पाणी वा माती यामार्फत मनुष्याला संसर्ग होतो.लक्षणे : या रोगाचे ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्राव इत्यादी लक्षणे आहेत. रुग्णांना श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होणे, मूत्रपिंड व यकृत निकामी होऊन त्यांना योग्य वेळी औषधोपचार न मिळाल्यास मृत्यू होण्याचा धोका संभवतो.

आजाराचा धोका यांना संभवतोपुराच्या पाण्यातून एकदाच चाललेल्या व्यक्ती ‘कमी जोखीम’ या गटात मोडतात.एकदाच पुराच्या पाण्यातून चाललेल्या, पण अंगावर किंवा पायावर जखम असलेल्या किंवा चुकून पुराचे पाणी तोंडात गेलेल्या व्यक्ती

‘मध्यम जोखीम’ या गटात येतात.एकापेक्षा अधिक वेळा पुराच्या पाण्याशी संपर्क आल्यास अशा व्यक्ती ‘अतिजोखीम’ या गटात मोडतात.यामध्ये आठ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि गरोदर महिला यांच्या बाबतीत अधिक खबरदारी घेणे गरजेचे असते.ही काळजी घ्यावी...पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यू, मलेरिया अथवा लेप्टोस्पायरोसिस असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष नकरता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा.साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुऊन कोरडे करावे.साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपचार तातडीने घेणे आवश्यक आहे.उंदीर-घुशींचा नायनाट करावा. उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न मिळवून न देणे, उंदराचे सापळे रचणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग वापरात आणावे.

टॅग्स :मुंबईमुंबईत पावसाचा हाहाकारहॉस्पिटल