वडघर येथे बिबट्याचा बकऱ्यांवर हल्ला
By Admin | Updated: May 9, 2015 22:42 IST2015-05-09T22:42:50+5:302015-05-09T22:42:50+5:30
मुरुड तालुक्यातील ऊसरोली ग्रामपंचायतीतील वडघर या गावात पहाटे एका बिबट्याने गोठ्यामध्ये बांधलेल्या चार बकऱ्या फरफटत नेऊन फस्त केल्या

वडघर येथे बिबट्याचा बकऱ्यांवर हल्ला
नांदगाव : मुरुड तालुक्यातील ऊसरोली ग्रामपंचायतीतील वडघर या गावात पहाटे एका बिबट्याने गोठ्यामध्ये बांधलेल्या चार बकऱ्या फरफटत नेऊन फस्त केल्या. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. फणसाड अभयारण्य जवळच असल्याने आठवड्यातून एकदा ग्रामस्थांना असा अनुभव येत असल्याने रहिवाशी भयभीत झाले आहेत.
वडघर येथील शेतकरी शंकर जनार्दन रोटकर यांनी आपल्या गोठ्यात दोन बोकड व दोन बकऱ्या बांधून ठेवल्या होत्या. पहाटे बिबट्याने चारही जनावरांना गोठ्यातून पळवले आणि त्यांचा फडशा पाडला.
घटनेची माहिती कळताच परिमंडळ वनाधिकारी मुरुड विलास पांडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हा अहवाल रोहा शाखेस पाठवण्यात येणार असून त्यानंतर शेतकऱ्यास आर्थिक मदत मिळणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.
फणसाड अभयारण्याच्या शेजारी अनेक छोटी गावे-वाड्या असल्याने अनेकदा जंगलातील हिंस्र श्वापदांचा याठिकाणी वावर आढळतो. सुपेगावात तर लोक सतत रात्रीचे जागरण करून बिबट्यांवर लक्ष ठेवून असतात. या गावात रोज रात्री बिबट्या कुत्रे, कोंबड्या व वासराचे शिकार करण्यासाठी येतो. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी रात्री फणसाड अभयारण्यांमार्फत चार पहारेकरी गस्त घालतात. (वार्ताहर)