‘सीएसएमटी’चा वारसा आता गुगलवर, देशातील ऐतिहासिक स्थळांची माहिती स्क्रीनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 05:35 IST2017-12-09T05:35:22+5:302017-12-09T05:35:32+5:30
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील वारसा जपण्यासाठी गुगल सरसावले आहे. मध्य रेल्वे आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक स्थळांच्या ‘डिजिटल स्क्रीन’चे अनावरण करण्यात आले.

‘सीएसएमटी’चा वारसा आता गुगलवर, देशातील ऐतिहासिक स्थळांची माहिती स्क्रीनवर
मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील वारसा जपण्यासाठी गुगल सरसावले आहे. मध्य रेल्वे आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक स्थळांच्या ‘डिजिटल स्क्रीन’चे अनावरण करण्यात आले. या वेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा, रेल्वे बोर्डाचे आर.के. शर्मा आणि गुगलचे कला व संस्कृती विभागाचे बेन गोम्स आणि रेल्वे वारसा विभागाचे सुब्रतोनाथ हे उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत पुढील दोन महिने सीएसएमटीवरील देशभरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती, वैशिष्ट्ये व्हिडीओच्या स्वरूपात दाखवण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत. या स्क्रीनवर देशभरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती, तेथे पोहोचण्याचे मार्ग, स्थळांची वैशिष्ट्ये व्हिडीओच्या स्वरूपात दाखवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेचे सीएसएमटी सर्वात वर्दळीचे टर्मिनस आहे. मध्य, हार्बरसह मेल-एक्स्प्रेसने प्रवास करणाºया प्रवाशांना धावपळीच्या आयुष्यात देशातील प्राचीन संस्कृतीचे दर्शन काही मिनिटांत घडवण्यासाठी गुगलने मध्य रेल्वेसोबत करार केला आहे.
देशातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि ऐतिहासिक सीएसएमटी स्थानकावर या स्क्रीनमुळे काही मिनिटांत प्रवाशांना ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळणार आहे. सीएसएमटीवरून रोज लाखो प्रवासी प्रवासाला सुरुवात करतात.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात देशातील प्राचीन कला आणि संस्कृती पाहून प्रवाशांचे मन प्रसन्न होईल, अशी माहिती स्क्रीन अनावरण केल्यानंतर गुगलचे गोम्स यांनी
दिली.