एलईडीमुळे १० कोटी युनिट वीज वाचेल!

By Admin | Updated: January 26, 2015 00:31 IST2015-01-26T00:31:50+5:302015-01-26T00:31:50+5:30

मुंबईतल्या रस्त्यांवर एलईडी दिवे बसविण्याहून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रंगलेला वाद चव्हाट्यावर

LED will save 10 million units of electricity! | एलईडीमुळे १० कोटी युनिट वीज वाचेल!

एलईडीमुळे १० कोटी युनिट वीज वाचेल!

मुंबई : मुंबईतल्या रस्त्यांवर एलईडी दिवे बसविण्याहून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रंगलेला वाद चव्हाट्यावर आला असतानाच मुंबईतल्या रस्त्यांवर एलईडी दिव्यांचा वापर सुरू केल्यानंतर १० कोटी युनिट वीज वाचेल, असा दावा भाजपाने केला आहे. परिणामी येथील रस्त्यांवर एलईडी दिवे बसवावेत की बसवू नयेत, याबाबतचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
मुंबई ही देशाचे आर्थिक केंद्र असल्याने कोणत्याही परिस्थितीत मुंबईला भारनियमनाला सामोरे जावे लागत नाही. क्वचित तांत्रिक बिघाड झाल्यास शहरातील वीजपुरवठा खंडित होतो. मात्र मुंबई शहराला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्समिशन लाइन्सची क्षमता संपली असून, भविष्यात मुंबईतील वीजपुरवठा खंडित होऊ नये, म्हणून ट्रान्समिशन लाइन्सची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. अशातच सद्य:स्थितीमध्ये ‘हेरिटेज’चा दर्जा असलेल्या क्वीन नेकलसवरील दिवे बदलाहून रंगलेला वाद आता आणखी चिघळला आहे.
शिवसेनेने क्वीन नेकलेसवरील दिवे बदलण्यास विरोध दर्शविला असतानाच ही योजना पर्यावरणपूरक, ऊर्जाबचत करणारी आणि महापालिकेचा पैसा वाचविणारी असल्याचा सूर भाजपाने लगावला आहे. आजघडीला मुंबईत बेस्ट, एमएसईबी आणि रिलायन्सचे मिळून सुमारे १ लाख ३२ हजार ४५८ दिव्यांचे खांब आहेत. त्यासाठी महापालिका दरवर्षी १६४ कोटी रुपये वीजबिल भरते आहे. या दिव्यांमुळे दरवर्षी २० कोटी युनिट वीज जळते. मात्र एलईडी दिव्यांचा वापर सुरू झाल्यास यातील निम्मे म्हणजे १० कोटी युनिट वीज वाचणार असल्याचा दावा भाजपा करीत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महापालिकेची वीजबिलापैकी ५० टक्के रक्कम वाचणार आहे. नव्याने दिवे बसविण्याचा खर्च २५० कोटी रुपये एवढा असून, त्यापैकी एकही रुपया आता महापालिकेला द्यावा लागणार नाही. ही रक्कम केंद्र महापालिकेला बिनव्याजी देणार आहे आणि त्याची परतफेड महापालिकेला पुढील सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने करता येईल. (प्रतिनिधी)

Web Title: LED will save 10 million units of electricity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.