टीएमटी वेळेवर सोडा, नाही तर पगार कापणार
By Admin | Updated: August 28, 2015 00:21 IST2015-08-28T00:21:38+5:302015-08-28T00:21:38+5:30
प्रवाशांना वक्तशीर सेवा मिळावी आणि कर्मचाऱ्यांनाही शिस्त लागावी म्हणून जेवढ्या उशिराने बस निघाली असेल, तेवढ्या वेळेचा तोटा म्हणून कार्यशाळेतील संबंधित कर्मचाऱ्यांच्या

टीएमटी वेळेवर सोडा, नाही तर पगार कापणार
ठाणे : प्रवाशांना वक्तशीर सेवा मिळावी आणि कर्मचाऱ्यांनाही शिस्त लागावी म्हणून जेवढ्या उशिराने बस निघाली असेल, तेवढ्या वेळेचा तोटा म्हणून कार्यशाळेतील संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारातून तेवढी रक्कम कापून घेण्याचा इशारा परिवहन व्यवस्थापकांनी दिला आहे. परिवहनच्या वागळे आगारात आजही किरकोळ कामांच्या दुरुस्तीसाठी ७५ हून अधिक बस बंद आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
बसमध्ये बॅटरी नसणे, काचा फुटणे, टायर नसणे आदींसह इतर काही किरकोळ कारणांमुळे ७५ हून अधिक बस वागळे आगारात गेल्या काही महिन्यांपासून धूळखात आहेत. परिवहनचे महाव्यवस्थापक संदीप माळवी यांनी मंगळवारी कर्मचाऱ्यांची याच मुद्यावरून ‘शाळा’ घेऊन कार्यशाळेचीही पाहणी केली असता या बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या. त्यानुसार, त्यांनी अकाउंट आणि इतर विभागांची तातडीची बैठक घेऊन यावर तत्काळ तोडगा काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यात बॅटरी नसलेल्या १५ बसमध्ये त्या बसविणे, सहा बसच्या काचा बसविणे आदींसह इतर किरकोळ कारणांसाठी उभ्या असलेल्या बसही तत्काळ दुरुस्त करून त्या सेवेत दाखल करण्याबाबत सूचना केल्या.
कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी वेळेत बस आगाराबाहेर काढल्या नाहीत तर त्यांच्या पगारातून तेवढ्या वेळेची रक्कम कापून घेण्यात येईल, असा इशारा देतानाच वेळ पडल्यास कामचुकार कर्मचाऱ्याला घरी बसविले जाईल, असेही महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता हे कर्मचारी कामाला लागले असून त्यांनी किरकोळ दुरुस्तीच्या १० बसेस रस्त्यावर काढल्या आहेत. तसेच उर्वरित बसेसही लवकरच दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)
लवकरच संख्या वाढणार
परिवहन आगारातून बुधवारी १९० बस बाहेर पडल्या असून २५ लाख ६२ हजार ६८७ उत्पन्न मिळाले आहे. येत्या आठवडाभरात २०० हून अधिक बस रस्त्यावर धावतील, असेही सूतोवाच महाव्यवस्थापकांनी केले आहे.
परिवहनच्या देण्यांसंदर्भात शुक्रवारी निर्णय...
परिवहन कर्मचाऱ्यांनी विविध स्वरूपाच्या शिल्लक देण्यांसंदर्भात १५ आॅगस्टला कामबंदची हाक दिली होती. त्यानंतर, २५ आॅगस्ट रोजी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. परंतु, त्या दिवशी बैठक होऊ शकली नाही. गुरुवारीसुद्धा महापौर बाहेरगावी गेल्याने यासंदर्भातील निर्णय शुक्रवारी घेण्यात येणार आहे.