‘मिठी’ला नदीच राहू द्या
By Admin | Updated: May 27, 2014 04:55 IST2014-05-27T04:55:55+5:302014-05-27T04:55:55+5:30
मिठी ही नदी होती आणि आहे; त्यामुळे तिला नदीच राहू द्या. तिच्या सौंदर्यीकरणाच्या हव्यासापायी तिचे मूळ स्वरूप नष्ट करू नका

‘मिठी’ला नदीच राहू द्या
मुंबई : मिठी ही नदी होती आणि आहे; त्यामुळे तिला नदीच राहू द्या. तिच्या सौंदर्यीकरणाच्या हव्यासापायी तिचे मूळ स्वरूप नष्ट करू नका. किंवा तिच्या काठावर संरक्षक भिंतीसह साबरमती फ्रंटसारखे प्रयोग मिठीवर करू नका, असे आवाहन पर्यावरणतज्ज्ञ अॅड. गिरीश राऊत यांनी केले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर मिठीच्या साफसफाईचा घाट घालण्यात आला आहे. तो चांगलाच आहे. मात्र या सर्वांत मिठीवर फ्रंटसारखा प्रयोग करणे हे धोकादायक आहे, असे राऊत यांचे म्हणणे आहे. मुळात देशातील कोणतीही नदी घ्या. तिच्या नैसर्गिक रूपाला जेव्हा हानी पोहोचते तेव्हा ती पावसाळ्यात सभोवतालच्या शहरांना उद्ध्वस्त करते. नदीच्या काठावर घाट बांधणे, नदीला संरक्षक भिंत बांधणे, नदीतून वाळू उपसणे, तिच्या पात्राला आणि मुखाला हानी पोहोचविणे म्हणजे नदीला हानी पोहोचविण्यासारखे आहे. उत्तरेतील गंगा अथवा यमुना; यांसारख्या नद्यांचीही अशीच हानी झाली आहे. गंगा नदीत प्रेतांसह प्रदूषित सांडपाणी सोडण्यात येत असल्याने ती दिवसेंदिवस प्रदूषित होते आहे. नद्यांवर धरणे बांधणे आणि नद्यांचा काठ कृत्रिम करणे; अशाने आपण नद्यांचे नैसर्गिक रूप नष्ट करत आहोत. मिठी नदीबाबतही आपण तेच केले आहे. तिला संरक्षक भिंत बांधून तिचा काठ नष्ट केला आहे. तिच्या खोलीकरणासाठी तिच्या पात्रात स्फोट केले. माहीम आणि वांद्रे येथील मिठीच्या पात्रात भराव टाकला. शिवाय औद्योगिक प्रदूषणामुळे मिठीत सांडपाणी सोडून तिचा नाला केला. तिला प्रदूषित केले. मात्र हे काहीच करण्याची गरज नाही. मिठीला हात लावण्याची गरज नाही. कारण तिचे नैसर्गिक स्वरूप कायम राहिले तरच ती नदी म्हणून जिंवत राहील. आपण नाल्याची नदी करताना तिला कृत्रिम स्वरूप देत आहोत. मात्र हे साफ चुकीचे आहे. कारण मिठी नदीमध्ये मानवी हस्तक्षेप करणेच चुकीचे आहे. परिणामी फ्रंटसारखा प्रयोग करण्याऐवजी, मिठीचे राजकारण करण्याऐवजी तिला नदी म्हणूनच जिंवत राहू द्या, असे राऊत यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)