समुद्राला नारळ वाहून नौका मासेमारीसाठी रवाना
By Admin | Updated: August 18, 2014 00:07 IST2014-08-18T00:07:07+5:302014-08-18T00:07:07+5:30
पावसाळी मासेमारी बंदीच्या ९२ दिवसांच्या प्रदीर्घ बंदीनंतर मच्छीमारांनी जाळी, डिझेल, बर्फ या मासेमारी साहित्याची जमवाजमव आणि मासेमारीला जाण्याची तयारी केली होती

समुद्राला नारळ वाहून नौका मासेमारीसाठी रवाना
पालघर : पावसाळी मासेमारी बंदी उठल्यानंतर सातपाटी खाडीतील गाळरुपी संकटावर तात्पुरत्या स्वरुपात मात करीत सातपाटी-मुरबे भागातील २२५ मच्छीमारी नौका मासेमारीसाठी शुक्रवारी दुपारी खोल समुद्रात रवाना झाल्या.
पावसाळी मासेमारी बंदीच्या ९२ दिवसांच्या प्रदीर्घ बंदीनंतर मच्छीमारांनी जाळी, डिझेल, बर्फ या मासेमारी साहित्याची जमवाजमव आणि मासेमारीला जाण्याची तयारी केली होती. परंतु सातपाटी खाडीत साचलेल्या गाळामुळे आपल्या नौका मासेमारीला जातील की नाही? या भीतीच्या छायेखाली सर्व मच्छीमार वावरत होते.
जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या तेरा कोटींच्या निधीतून गाळ काढण्याचे काम सुरु होत नसल्याने यावर्षीही लोकवर्गणीतून पैसे काढीत नौकानयन मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न मच्छीमार नौकाधारकांकडून सुरु होता, परंतु तिथीप्रमाणे पंचमीमध्ये समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्याने मच्छीमारांनी आपल्या नौका पश्चिमेकडील समुद्रातील खोल भागात नांगरुन ठेवल्या.
शुक्रवारी सकाळी मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी नंदू पाटील यांनी मच्छीमारांना परवाने तर कस्टम विभागाने खलाशी कामगारांना पासेस दिल्यानंतर मच्छीमारांनी आपल्या नौका समुद्रात धाडल्या.
(वार्ताहर)