Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून सुरू झाल्या एक पुस्तकी शाळा, दप्तराचे ओझे कमी करणारा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2023 13:36 IST

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विदर्भ वगळता राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. दप्तराचे ओझे कमी करणारा हा ऐतिहासिक दिवस असेल. स्वयंअर्थसहाय्यित आणि अद्याप अनुदानावर न आलेल्या सर्व शाळांमधील विद्यार्थी फक्त एक पाठ्यपुस्तक घेऊन उद्यापासून शाळेत जातील. दप्तराचे ओझे कमी करण्याविषयी आजवर खूप बोलले गेले पण उद्या त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असल्याचे समाधान आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

सर्व विषयांसाठी एकच पुस्तक घेऊन ही चिमुरडी शाळांची पायरी चढणार आहेत. इयत्ता पहिली ते आठवी इयत्तेच्या मुलांसाठी हा निर्णय लागू असेल. त्याचसोबत सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना एकच गणवेश देखील असणार आहे. मुलांना आकाशी निळ्या रंगाचा शर्ट आणि गडद रंगीत पँट तसेच मुलींना आकाशी निळ्या रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा फ्रॉक असा हा गणवेश आहे.

  • पालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळा गुरुवारी सुरू होणार आहेत. पहिली ते दहावीच्या या शाळांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
  • मुलांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात चांगली व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्याच दिवसापासून विविध उपक्रम रावबिण्याचे ठरविले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मुलांच्या प्रवेशाची तयारी केली आहे. यामध्ये वर्गखोल्या, पाण्याची टाकी, शाळेचे आवार आदींची स्वच्छता करण्यात आली. या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी २७ शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.

बूट आणि मोजे मिळणार महिनाभरात

  • एकाच पुस्तकात सर्व विषयांचे पाठ देण्यात आले आहेत. प्रत्येक तिमाहीसाठी एक यानुसार चार टर्मसाठी चार पुस्तके असणार आहेत. या चार पुस्तकांचे मोफत वाटप केले जाणार आहे.
  • पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके मिळणार आहेत. 
  • मुलांना गणवेशासोबतच बूट आणि मोजेदेखील येत्या महिन्याभरात देण्यात येणार आहेत. 
  • मुलांमध्ये सेवेची भावना वाढीला लागावी म्हणून स्काउट आणि गाईड इयत्ता पहिली पासूनच अनिवार्य करण्यात येणार आहे.
टॅग्स :शाळा