Join us

'ललितला तुरुंगात टाकून प्रकरण मिटेल हा आव सरकारने आणू नये'; विजय वडेट्टीवरांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 17:07 IST

ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी ट्विट प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या ड्रग्स प्रकरणातील माफिया ललित पाटील याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, ललित पाटिलला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे. तिथे प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, ललित पाटील याने धक्कादायक दावा केला आहे. मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नव्हतो, तर मला पळवण्यात आलं होतं. यामागे कुणाकुणाचा हात आहे, हे मी सगळं सांगणार आहे, असा दावा ललित पाटीलने केला आहे.

ललित पाटीलच्या या विधानामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मात्र दूसरीकडे तो स्वत:चा बचाव करण्यासाठी अशी विधानं करत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. सदर प्रकरणावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी ट्विट प्रतिक्रिया दिली आहे. ससून रुग्णालय ड्रग्स प्रकरणातील आरोपी पाटील पंधरा दिवसांनी सापडला, पण असे अनेक "ललित" अजूनही मोकाट आहे. ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ चे रहस्य काय आहे हे राज्यातील जनतेच्या सामोरं यायला हवे. ललित पाटीलला तुरुंगात टाकून सर्व प्रकरण मिटले हा आव सरकारने आणू नये, असं विजय वडेट्टीवर यांनी म्हटलं आहे. 

आरोपीला पळायला कोणी मदत केली होती ? महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा आशीर्वाद पाटील ला होता? रुग्णालयातून ड्रग पुरवण्याचे धंदे कसे सुरू होते? ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे राज्यात कुठपर्यंत पोहोचले आहे...असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी देखील विजय वडेट्टीवर यांनी केली आहे.

दरम्यान, दरम्यान, पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर ललित पाटील हा नाशिकला गेला होता. तिथे काही काळ राहिल्यानंतर तो इंदूरला गेला. तर तिथून गुजरातला गेला होता. त्याठिकाणाहून त्याने टूर्स आणि ट्रॅव्हल्स गाडी भाड्याने घेतली. त्या गाडीने तो कर्नाटकात गेला. यादरम्यान, त्याने महाराष्ट्रातून प्रवास केला. त्यानंतर तो चेन्नईला पोहचला. नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी कारवाई केली तेव्हा ललित पाटीलच्या एका निकटवर्तीयाला अटक करण्यात आली होती. परंतु याची कुठलीही खबर माध्यमांना लागून दिली नाही. पोलिसांच्या अटकेत असलेल्या या आरोपीलाच ललित पाटीलचा फोन आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी व्यक्तीला ललित पाटीलशी बोलायला सांगितले. त्यानंतर ललितने कशारितीने तो फरार झाला, कुठून कसा गेला हे सांगितले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पाठलाग करून ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली.

टॅग्स :अमली पदार्थविजय वडेट्टीवारपोलिस