लक्ष्मण, प्रियदर्शन अग्रस्थानी
By Admin | Updated: June 7, 2015 00:40 IST2015-06-07T00:40:33+5:302015-06-07T00:40:33+5:30
ग्रँडमास्टर आर. आर. लक्ष्मण आणि इंटरनॅशनल मास्टर प्रियदर्शन या भारतीयांनी चमकदार कामगिरी करताना अनुक्रमे ग्रँडमास्टर झीऔर रेहमान आणि ग्रँडमास्टर एनग्युयेन डुकहोआ या कसलेल्या खेळाडूंना धक्का दिला.

लक्ष्मण, प्रियदर्शन अग्रस्थानी
मुंबई : ग्रँडमास्टर आर. आर. लक्ष्मण आणि इंटरनॅशनल मास्टर प्रियदर्शन या भारतीयांनी चमकदार कामगिरी करताना अनुक्रमे ग्रँडमास्टर झीऔर रेहमान आणि ग्रँडमास्टर एनग्युयेन डुकहोआ या कसलेल्या खेळाडूंना धक्का दिला. या शानदार विजयासह दोन्ही खेळाडूंनी ८व्या मुंबई महापौर आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत थेट ग्रँडमास्टर क्रेवत्सिव मार्टिन याच्यासोबत संयुक्तरीत्या अव्वल स्थानी झेप घेतली.
गोरेगाव स्पोटर््स क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत लक्ष्मणने आपला सर्व अनुभव पणास लावताना रेहमान विरुध्द सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. काळ्या मोहऱ्यांनी खेळताना लक्ष्मणने रेटी पध्दतीने सुरुवात करुन अल्पावधीतच बोर्डवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. दरम्यान रेहमानने लक्ष्मणच्या राजाला अनेकदा शह देण्याचा प्रयत्न केला .या नादात त्याचे इतर ठिकाणी दुर्लक्ष झाल्याने ४०व्या चालीमध्येच त्याने लक्ष्मणच्या हल्ल्यासमोर शरणागती पत्करली. या विजयासह लक्ष्मणने सलग तीन सामन्यांत बाजी मारुन हॅट्ट्रीक नोंदवली.
दुसऱ्या बाजूला तिसऱ्या बोर्डवर खेळणाऱ्या प्रियदर्शनने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कसलेल्या एनग्युयेनने सिसिलियन बचावाचा अवलंब करुन डावाला सुरुवात केली. प्र्रियदर्शनने कोणतीही घाई न करता एनग्युयेनच्या संयम पाहिला. दरम्यान ३९व्या चालीमध्ये प्र्रियदर्शनने एनग्युयेनचा प्यादा जिंकला आणि त्यानंतर आक्रमक चालींच्या जोरावर त्याने ६९ चालींमध्ये सामना जिंकला
त्याचवेळी ग्रँडमास्टर क्रेवत्सिव याने कोणताही धोका न पत्करता अनुभवी ग्रँडमास्टर कोकारेव दिमित्री सोबत १२ चालींमध्येच बरोबरी मान्य करताना अर्धा गुणांच्या कमाईसह स्पर्धेतील अव्वल स्थान संयुक्तरीत्या कायम राखले. ग्रँडमास्टर झुबोव अलेक्झांडर, ग्रँडमास्टर पावेल स्मिरनोव, ग्रँडमास्टर लुका पैछाडझे आणि इंटरनॅशनल मास्टर शोता अझालद्झे या कसलेल्या खेळाडूंसह बिगमानांकीत हर्षा भारथकोटी याने संयुक्तरीत्या दुसरे स्थान पटकावले आहे. या सर्वांचे प्रत्येकी ५.५ गुण आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)