मुंबई : न्यायालयांमध्ये बार असोसिएशनसाठी स्वतंत्र इमारतीसह वकिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी ५ हजार कोटींची तरतूद करण्याची मागणी करत देशात विविध ठिकाणी वकिलांनी सरकारविरोधात निदर्शने केली. मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या आंदोलनानंतर बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाला विद्यासागर राव यांची भेट घेतली. यावेळी वकिलांच्या मागण्या रास्त असून त्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती बार कौन्सिल आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष अॅड. सतिश देशमुख यांनी दिली.देशमुख म्हणाले की, वकिलांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्या, वकिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी अर्थसंकल्पामध्ये पाच हजार कोटींची तरतूद करण्यात यावी या मागण्या रास्त असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. राज्यपाल विद्यासागर राव यांनी आपण स्वत: वकिल असल्याने या मागण्यांबाबत जातीने लक्ष घालून कार्यवाही करण्याचे आश्वासित केले.देशातील विविध राज्यांत झालेल्या आंदोलनात स्थानिक मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासने दिल्याची माहिती बार कौन्सिल आॅफ इंडियाने दिली. म्हणूनच आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बुधवारी दिल्लीला बार कौन्सिलची बैठक होणार आहे. त्यात होणारा निर्णय लवकरच सर्व वकिलांना कळवणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
सरकारविरोधात मुंबईत वकिलांची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 01:29 IST