लोकल पकडण्यासाठी लावा रांग, ‘माय लेफ्ट इज माय राइट’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:48 IST2019-11-12T23:48:42+5:302019-11-12T23:48:46+5:30
लोकल आणि एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी शिस्तबद्ध रांगा लावून चढण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाकडून करण्यात येत आहे.

लोकल पकडण्यासाठी लावा रांग, ‘माय लेफ्ट इज माय राइट’ उपक्रम
मुंबई : लोकल आणि एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी शिस्तबद्ध रांगा लावून चढण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाकडून करण्यात येत आहे. लोकलमध्ये चढताना धक्काबुक्की होते. त्याचे रूपांतर मारामारीत होते. आरपीएफकडून ‘माय लेफ्ट इज माय राइट’ उपक्रमातून प्रवाशांना रांगेत जाण्याचे आवाहन केले जात आहे. लोकलमध्ये चढताना धक्काबुक्की, भांडणे याला पूर्णविराम मिळेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे.
एक्स्प्रेसमधील ‘आॅपरेशन क्यू’द्वारे प्रवाशांना एका रांगेत मेल, एक्स्प्रेसमध्ये चढण्या-उतरण्याचे आवाहन केले जाणार आहे. प्रवासी आपल्या साहित्याची ने-आण योग्यरीत्या करू शकतील. सुरक्षा जवानांना प्रवाशांच्या साहित्याची तपासणी करता येईल. ‘माय लेफ्ट इज माय राइट’ या संकल्पनेची माहिती ‘आॅपरेशन क्यू’मध्ये दिली जात आहे. मेल, एक्स्प्रेसमध्ये चढताना-उतरताना रांगेत उतरल्यास धक्काबुक्की होणार नाही. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने घेण्यात येत आहे. विशेष एक्स्प्रेस, स्थानकावरील गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहे.
पश्चिम रेल्वेचे भार्इंदर, बोरीवली मध्य रेल्वेचे दादर, कल्याण, बदलापूर, शहाड येथे प्रवासी रांगा लावून लोकलमध्ये चढतात. प्रथम श्रेणीच्या डब्याजवळ प्रवासी रांगा लावून उभे राहतात. यासह महिला डब्याजवळ महिला प्रवाशांकडून रांग लावली जाते.
।‘माय लेफ्ट इज माय राइट’ या संकल्पनेचा अवलंब करा
रेल्वे सुरक्षा बलाकडून ‘माय लेफ्ट इस माय राइट’ ही संकल्पना सुरू केली आहे. या संकल्पनेतून प्रवाशांना डाव्या बाजूने जिन्यावरून चढण्याचे-उतरण्याचे आवाहन केले जात आहे. लोकल, एक्स्प्रेसमध्ये चढताना-उतरताना रांगेत उतरण्यासाठी आवाहन करत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अश्रफ के. के. यांनी दिली.