Join us  

नवीन 30 बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करणार, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 7:52 PM

आरोग्य विभागाकडून मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेल्या बाईक अ‍ॅम्ब्युलन्सचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता मुंबईत अजून १० व राज्याच्या दुर्गम व डोंगरी भागात २० अशा 30 नवीन बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करणार असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.

मुंबई : आरोग्य विभागाकडून मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेल्या बाईक अ‍ॅम्ब्युलन्सचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता मुंबईत अजून १० व राज्याच्या दुर्गम व डोंगरी भागात २० अशा 30 नवीन बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करणार असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. मुंबईत ही सेवा सुरू झाल्यापासून  पाच महिन्यांमध्ये १००० पेक्षा जास्त रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत  बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ  १ ऑगस्ट २०१७ रोजी करण्यात आला. ही सेवा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून विविधस्तरातून प्रतिसाद मिळत आहे. अरुंद रस्ते, रेल्वे स्थानकालगतचा परिसर याठिकाणाहून बाईक ऍम्ब्युलन्सच्या सेवेसाठी कॉल मोठ्या प्रमाणावर येत आहेत. आतापर्यंत १३०२ रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवदान देण्यात आले आहे. ही  मोफत सेवा असून १०८ याक्रमांकावर उपलब्ध आहे. अरुंद रस्ते व डोंगराळ भागात जिथे चारचाकी रुग्णवाहिका नेणे अशक्य आहे त्या ठिकाणी या बाईक अ‍ॅम्ब्युलन्सने सहजरित्या पोहोचणे शक्य आहे. याचा विचार करून राज्यातील पालघर, जव्हार, मोखाडा, नंदुरबार, मेळघाट अशा दुर्गम भागात 20 बाईक अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून सेवा सुरू करणार असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.या बाईकचे चालक हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे रुग्णांवर लगेचच प्रथमोपचार करून प्लॅटिनम मिनिट्समध्ये रुग्णांना उपचार देणे शक्य होणार आहे. सध्या मुंबई मध्ये भांडुप, कुरार, मालाड, चारकोप, नागपाडा, गोरेगाव फिल्म सिटी, मानखुर्द, धारावी पोलिस ठाणे, खार दांडा पोलिस ठाणे, ठाकूर व्हिलेज व कलिना कॅम्पस सांताक्रुज या ठिकाणी मोटरबाईक ऍम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत. लवकरच मुंबईत अजून 10 बाईक ऍम्ब्युलन्स सुरू करण्यात येतील असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई