मुरुडमध्ये ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा शुभारंभ
By Admin | Updated: January 28, 2015 22:52 IST2015-01-28T22:52:00+5:302015-01-28T22:52:00+5:30
सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी करण्यात आला.

मुरुडमध्ये ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा शुभारंभ
मुरुड : सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी करण्यात आला.
मुरुड तालुक्यातील मौजे आरावघर येथे कोरडवाहू शेती अभियानांतर्गत शेततळे कामाचा शुभारंभ पंचायत समिती सभापती काळीताई ठाकूर, उपसभापती अपर्णा सुर्वे, तहसीलदार एल. डी. गोसावी, गटविकास अधिकारी संदीप जठार, तालुका कृषी अधिकारी दिलीप भड यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यात सुमारे ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू तर ५२ टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. २०१४-१५ मध्ये भूजल पातळीमध्ये २ मीटरपेक्षा जास्त घट झालेले १८८ तालुक्यातील २२३४ गावे समाविष्ट असून २२ जिल्ह्यांमध्ये १९ हजार ५९ गावांमध्ये टंचाई परिस्थिती जाहीर केली आहे. या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान राबवणे आवश्यक आहे. तसेच भविष्यात राज्यातील उर्वरित भागात पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी उपाययोजना प्रभावीपणे करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता विविध विभागांतर्गत मंजूर असलेल्या योजना मंजूर निधी, आमदार खासदार निधी, जिल्हावार निधी, अशासकीय संस्था, सीएसआर व लोकसहभाग यांच्या माध्यमातून टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास मान्यता दिली आहे.
मुरुडमध्ये ७४ गावांपैकी ४२ गावांमध्ये पाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंट काँक्रीट बंधारे, खोलीकरण, रुंदीकरण, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, साठवण तलाव, शिवकालीन, ब्रिटिशकालीन तलाव, आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत.