स्वच्छ नवी मुंबई मिशनचा धडाक्यात शुभारंभ
By Admin | Updated: March 8, 2015 00:26 IST2015-03-08T00:26:40+5:302015-03-08T00:26:40+5:30
महानगरपालिकेने स्मार्ट नवी मुंबई मिशन हाती घेतले आहे. मिशनच्या पहिल्या टप्प्यात स्वच्छता हा महत्त्वपूर्ण विषय हाती घेण्यात आला आहे.

स्वच्छ नवी मुंबई मिशनचा धडाक्यात शुभारंभ
नवी मुंबई : महानगरपालिकेने स्मार्ट नवी मुंबई मिशन हाती घेतले आहे. मिशनच्या पहिल्या टप्प्यात स्वच्छता हा महत्त्वपूर्ण विषय हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत स्वच्छ नवी मुंबई मिशन या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.
कोपरखैरणेमधील जुन्या क्षेपणभूमीवर विकसित करण्यात आलेल्या निसर्ग उद्यानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईचा नेत्रदीपकरीत्या विकास झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेस आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, मलनि:सारण केंद्र व इतर अनेक कामांसाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. आता महापालिकेने स्मार्ट सिटीसाठीचे आवश्यक मानदंड पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या मिशनचा पहिला टप्पा म्हणून स्वच्छ नवी मुंबई मिशन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
स्मार्ट सिटीची संकल्पना ही आताची असली तरी त्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल यापूर्वीच सुरू झाल्याचे गौरवोद्गार पवार यांनी यावेळी आपल्या भाषणातून काढले. प्रत्येकाच्या जीवनात स्वच्छतेला महत्त्व आहे. स्वाइन फ्लू व इतर आजारांचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता राखली पाहिजे. स्वच्छ नवी मुंबई मिशन या उपक्रमाद्वारे स्वच्छतेच्या जाणिवा आणखी प्रगल्भ होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रास्ताविकपर भाषणातून या उपक्रमाचा आढावा घेतला. तसेच विविध पातळीवर महापालिकेने प्राप्त केलेल्या यशाची माहिती दिली.
स्मार्ट नवी मुंबई मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ नवी मुंबई मिशनमुळे शहराचा नावलौकिक आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महापौर सागर नाईक यांनी आपल्या भाषणातून या योजनेची थोडक्यात माहिती दिली. येत्या दोन वर्षांत नवी मुंबईला देशातील अव्वल क्रमांकाचे शहर करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)