Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर कार्बन डायऑक्साईड वापरून श्वसन करतात का?' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 15:11 IST

सलगता हीच कोणत्याही इको सिस्टीमच्या जगण्याची पूर्वअट आहे. एक तर त्या खोटं बोलत आहेत किंवा आयएएसच्या अभ्यासक्रमात इकॉलॉजीचा समावेश नसावा.

मुंबई - मेट्रो कारशेडसाठी आरे येथील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. शुक्रवारी रात्री अचानकपणे आरेमधील वृक्षतोड करण्यात आली. त्याविरोधात लोकांचा प्रचंड आक्रोश दिसून आला. मात्र ज्येष्ठांच्या पिढीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलणं सोडून दिलंय का? आरेच्या प्रश्नावर मेधाताई सोडून कोणी बोलणार आहे की नाही? लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर कार्बन डायऑक्साईड वापरून श्वसन करतात का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी उपस्थित केला आहे. 

आरेतील वृक्षतोडीविरोधात विश्वंभर चौधरी म्हणतात की, दरवेळी अण्णांकडूनच अपेक्षा नाही. ज्यांना महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं असे मोठे सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात आहेत. साहित्यिक, कलावंत, खेळाडू कधी बोलणार? त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजन लागत नाही? असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना अश्विनी भिडे यांनी सांगितलेलं खोटं आहे. जैवविविधता जपतांना अमूक एक भाग बिनमहत्वाचा असं कधीच नसतं. सलगता हीच कोणत्याही इको सिस्टीमच्या जगण्याची पूर्वअट आहे. एक तर त्या खोटं बोलत आहेत किंवा आयएएसच्या अभ्यासक्रमात इकॉलॉजीचा समावेश नसावा. धोरणकर्त्यांच्या परिस्थितीकीय ज्ञानाचे पोषण व्हावे म्हणून आयएएसच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश व्हावा आणि आमदार, खासदार, मंत्री यांना प्रशिक्षण देण्यात यावे असा टोलाही विश्वंभर चौधरी यांनी लगावला आहे. भुयारी मेट्रो-तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीत वृक्षतोड सुरू झाली असून, त्यास विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना रोखण्यासाठी पोलिसांना नाकाबंदी करावी लागली. शनिवारी सकाळी जमावबंदीचे आदेश लागू करून, पोलिसांनी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड व शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, तसेच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या २९ जणांना नंतर सोडण्यात आले.

उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका शुक्रवारी फेटाळताच प्रशासनाने सुमारे ५00 झाडे पाडली. शनिवारी तिथे जाणारे रस्ते बंद केले. वृक्षतोड सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला. वृक्षतोडीचे फोटो काढले जाऊ नयेत, म्हणून आंदोलकांचे मोबाइलही ताब्यात घेतले. वृक्षतोडीविरोधात आंदोलकांनी केलेला अर्ज उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने शनिवारी फेटाळला. आरेतील स्थानिकांच्याही गाड्यांची तपासणी व चौकशी होत होती. प्रसारमाध्यमांनाही प्रवेशबंदी करण्यात आली होती. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरआरेलता मंगेशकर