Join us

ब्लॉगरसाठी भारत-पाक सामना ठरला अखेरचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:53 IST

उबेर प्रवाशाचा मृत्यू; आरे पोलिसांकडून एकाला अटक

मुंबई : कांदिवलीत मित्राच्या घरून भारत-पाक सामन्याचा जल्लोष करुन परत येत असलेल्या तरुणाचा कार अपघातात मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला़ याप्रकरणी आरे पोलिसांनी नशेत भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या कार चालकाला अटक केली असून चौकशी सुरू आहे.अंधेरीच्या चार बंगला परिसरात राहणारे तसेच व्यवसायाने बिझनेस ब्लॉगर असलेले शैलेश मिश्रा (३३) हे रविवारी रात्री भारत पाक क्रिकेट सामना पाहण्यासाठी त्यांच्या कांदिवलीतील मित्राकडे गेले होते. रात्री दिडच्या सुमारास ते उबेरने घरी निघाले. गोरेगावच्या विरवानी परिसरात पोहोचताच एक भरधाव कार त्यांच्या दिशेने आली.तिने उबेर टॅक्सीला जोरदार धडक मारली. प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भयानक होता की त्यामुळे उबेर टॅक्सीने तीन वेळा जागीच गिरक्या घेतल्या. या अपघातात मिश्रा गंभीर जखमी झाले तर उबेर चालकालाही दुखापत झाली. त्यांना जोगेश्वरीच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी सुधांशु साबु (१९) या कारचालकाला अटक केली. तो गोरेगावच्या ओबेरॉय इमारतीत राहत असुन अपघाताच्या वेळी तो नशेत होता.त्यातच त्याने हा अपघात केला. वाराणसीचे रहिवासी असलेले मिश्रा यांना सहा महिन्याची मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. साबुला न्यायालयीन कोठडी सुनाविल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :मृत्यूवर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्तान