Join us  

अखेर ती आलीच... ग्लोबल टिचरच्या ट्रॉफीचं असं केलं स्वागत, डिसले गुरुजींना अत्यानंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:29 AM

सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत रणजितसिंह डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत.

ठळक मुद्देग्लोबल टिचर अवॉर्डची ट्रॉफी आता त्यांना घरपोच मिळाली आहे. डिसले गुरुंजींना आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्रॉफीसोबतच फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे

 मुंबई – जागतिक पातळीवरील वर्ष 2020 चा ‘ग्लोबल टिचर अॅवॉर्ड’ पटकावल्यानंतर, सोलापूरच्यारणजितसिंह डिसले गुरुजींवर चोहो बाजूंनी कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. देशभरातून आणि परदेशातूनही त्यांच्या कामगिरीचं दिग्गजांनी कौतुक केलं. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते पंतप्रधान कार्यालयानेही डिसले गुरुजींचे अभिनंदन केले. मात्र, कोविड महामारीमुळे हे सर्व ऑनलाईनच होत होतं. डिसले गुरुजींना ग्लोबल टिचर्स अवॉर्ड सोहळ्यालाही हजेरी लावता आली नाही. त्यामुळे, आता डिसले गुरुजींनी मिळवलेली ट्रॉफी त्यांना घरपोच आली आहे. 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत रणजितसिंह डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे. ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. आपल्या याच कल्पकता आणि संशोधनात्म वृत्तीच्या जोरावर त्यांनी ग्लोबल टिचर अवॉर्ड मिळवला आहे. मात्र, कोविडमुळे त्यांना हा पुरस्कार सोहळा ऑनलाईनच पाहावा लागला. ग्लोबल टिचर अवॉर्डची ट्रॉफी आता त्यांना घरपोच मिळाली आहे. डिसले गुरुंजींना आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्रॉफीसोबतच फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.  हीच ती जीची मी वाट पाहत होतो, असे कॅप्शन डिसले गुरुजींना या फोटोला दिले आहे. या फोटोत ते ट्रॉफीला कीस करताना दिसत आहेत.  

11 देशात क्यूआर कोड पुस्तकांचा वापर

रणजितसिंह डिसले यांनी लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले. या स्कॉलरशिपसंदर्भात रणजितसिंह डिसले यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली. पाठ्यपुस्तकातल्या प्रत्येक धडय़ाला एक स्वतंत्र ‘क्यूआर’ किंवा क्विक रिस्पॉन्स कोड दिल्यामुळे कोणालाही शाळेबाहेर कुठेही आणि केव्हाही तो धडा श्राव्य किंवा दृक्-श्राव्य माध्यमातून समजून घेणे सोपे झाले. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशांतील दहा कोटीहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हून अधिक देशातील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात.

डिसले गुरुजींच्या नावे स्कॉलरशीप

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. ‘कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप’ या नावाने 400 युरोची ही स्कॉलरशिप इटलीतील सॅमनिटे राज्यातील दहा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार आहेत. विद्यापीठ स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाणार असून याकरिता संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. पुढील दहा वर्षे 100 मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 चे विजेते रणजितसिंह डिसले यांनी मिळालेल्या पुरस्कार रकमेतील म्हणजेच 7 कोटींपैकी अर्धी रक्कम म्हणजेच साडे तीन कोटींची रक्कम 9 देशातील शिक्षकांना वाटून दिली होती. इटलीचे कार्लो मझुने हे त्यापैकीच एक आहेत. 

टॅग्स :रणजितसिंह डिसलेकोरोना वायरस बातम्यासोलापूरबार्शी