आईच्या मृत्यूनंतरही ‘तिने’ दिला शेवटचा पेपर
By Admin | Updated: March 25, 2015 23:00 IST2015-03-25T23:00:19+5:302015-03-25T23:00:19+5:30
वर्षभर आजाराने अंथरुणावर खिळलेल्या आईचा मृत्यू झाला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आईच्या पार्थिवाला अग्नी देताच तिने आपल्या काळजावर दगड ठेवत विज्ञान विषयाचा शेवटचा पेपर दिला.

आईच्या मृत्यूनंतरही ‘तिने’ दिला शेवटचा पेपर
दासगाव : वर्षभर आजाराने अंथरुणावर खिळलेल्या आईचा मृत्यू झाला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आईच्या पार्थिवाला अग्नी देताच तिने आपल्या काळजावर दगड ठेवत विज्ञान विषयाचा शेवटचा पेपर दिला. महाड तालुक्यातील गांधारपाले गावातील प्रणाली महादेव जाधव या महाविद्यालयीन तरुणीच्या शिक्षणाविषयीच्या जिद्दीचे सर्वांनीच कौतुक केले.
महाड तालुक्यातील गांधारपाले गावातील प्रणाली महादेव जाधव ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. विज्ञान विषयात प्रथम वर्षात शिकत असलेल्या प्रणालीची आई गेल्या काही वर्षांपासून आजारी असल्याने अंथरुणालाच खिळलेली होती. वडील हे टेम्पोरिक्षा चालवतात तर मोठ्या बहिणीचे लग्न झालेले आहे. घरातील लहान भाऊ देखील कामाला जातो. आजारी असलेल्या आईची देखभाल तसेच घरातील जेवण बनवण्याची जबाबदारी तिच्यावर होती. घरातील बेताची परिस्थिती आणि जबाबदारी पार पाडत प्रणाली शिक्षण घेत होती.
मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास प्रणालीच्या आजारी आईचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी साडेदहा वाजता मृत आईचा अंत्यविधी पार पडला आणि जराही खचून न जाता प्रणालीने महाविद्यालय गाठले. विज्ञान विषयातील शेवटचा पेपर देण्याकरिता मन घट्ट करत तिने हजेरी लावली. शिक्षण घेण्याकरिता आणि आपले शेवटचे वर्ष वाया जाऊ नये याकरिता प्रणालीने दाखवलेले धाडस आणि जिद्द कौतुकास्पद ठरले आहे.
(वार्ताहर)