Join us  

बेस्टमधील शेवटचा कर्मचारी तंबाखूमुक्त करणार; बेस्ट प्रशासनचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 1:41 AM

बीएपीएस स्वामीनारायण संस्थेच्या वतीने ‘जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे’ औचित्य साधून ‘प्रेयर रॅली’चे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या वतीने वडाळा आगारातील तांत्रिक प्रशिक्षण केंद्रामध्ये गुरुवारी ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या वेळी बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर व सदस्य सुनिल गणाचार्य, इंडियन कॅन्सर सोसायटीचे सहसंचालक डॉ. अर्जुन शिंदे आदींची उपस्थिती होती.

बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर म्हणाले की, बेस्ट उपक्रमामध्ये ‘तंबाखू मुक्त बेस्ट अभियान’ राबविण्यासाठी बेस्ट उपक्रम सदैव तत्पर आहे. याकरिता आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. हे अभियान बेस्ट उपक्रमातील शेवटचा कर्मचारी तंबाखूमुक्त होईपर्यंत राबविण्यात येईल.डॉ. अनिलकुमार सिंगल यांनी सांगितले की, २५ ग्रॅम याप्रमाणे बडिशेप, ओवा, जिरे, दालचिनी, तांदूळ आणि ४ ते ५ लवंग एकत्रित मिश्रण करून मॅजिक मिक्स तयार केले जाते. ते खाल्ल्याने व्यक्तीला तंबाखू खाण्याची इच्छा होत नाही. बेस्ट उपक्रमामध्ये आतापर्यंत पाच हजार कर्मचाऱ्यांनी याचा अवलंब केल्याने त्यांचे तंबाखूचे व्यसन सुटले आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य समिती व नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी महापालिका मुख्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भित्तीपत्रकाच्या प्रदर्शनास महापौर विश्वनाथ महाडेश्वर, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या राखी जाधव, विविध पक्षांचे गटनेते, नगरसेवक यांनी पाहणी केली. सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी उपस्थित कर्मचारी, अधिकारी, मुंबईकरांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. मुंबई तंबाखूमुक्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य समितीद्वारे ३१ मे पासून मुंबईत मोठ्या प्रमाणात हे अभियान राबविण्यात येणार आहे. ‘तंबाखू मतलब खल्लास - तंबाखूमुक्त मुंबई’ नारा देत, तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला.बीएपीएस स्वामीनारायण संस्थेच्या वतीने ‘जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे’ औचित्य साधून ‘प्रेयर रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. दादर पूर्वेकडील बीएपीएस स्वामीनारायण मंदिर ते शिवाजी पार्कपर्यंत शुक्रवारी रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान, व्यसनमुक्त जीवन जगा आणि व्यसनापासून दूर राहा, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. रॅलीमध्ये सुमारे ८०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :बेस्ट