पतंगरावांची शेवटची निवडणूक

By Admin | Updated: September 7, 2014 23:56 IST2014-09-07T23:52:15+5:302014-09-07T23:56:47+5:30

पत्रकार परिषदेत केली घोषणा : यापुढे ‘विधानसभा’ नाही

Last election of Kangarwa | पतंगरावांची शेवटची निवडणूक

पतंगरावांची शेवटची निवडणूक

सांगली : यंदा मी विधानसभेची शेवटचीच निवडणूक लढविणार आहे. पुढील कालावधीत कुठून कोणती निवडणूक लढवायची, याचा निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आज, रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या घोषणेतून त्यांनी लोकसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले असले, तरी त्यावर अधिक भाष्य करणे टाळले.
ते म्हणाले की, विधानसभेची शेवटची निवडणूक मी यंदा लढवीत आहे. यापुढे विधानसभेच्या रिंगणात उतरणार नाही. पुढील गोष्टी नंतर स्पष्ट करण्यात येतील. ही निवडणूक मला फार अवघड नाही. तरीही आता यापुढे विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यात आघाडीलाही कोणती अडचण नाही; मात्र परस्परांच्या खोड्या काढणे आता दोन्ही पक्षांतील नेत्यांनी बंद करावे. एकदा अशा गोष्टीमुळे नुकसान झाले आहे. पुन्हा त्याच गोष्टी करू नयेत. सत्ता गेल्यावर काय स्थिती होईल, याचे भान आघाडीच्या सर्वच नेत्यांनी ठेवावे. खोड्या काढणे बंद झाले नाही, तर सर्वांनाच घरी बसावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे काही नेते महायुतीत चालले असले, तरी काळजी करण्याचे कारण नाही. कॉँग्रेसकडून राष्ट्रवादीला पाठबळ मिळेल. ज्यांनी राष्ट्रवादीचा आजवर फायदा घेतला, ते स्वार्थासाठी अन्य पक्षांत जात आहेत. प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेल्या काही लोकांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच खतपाणी घालून मोठे केले. त्यामुळे आता ते डोईजड होत आहेत, अशी टीका कदम यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या केली. अशा गोष्टींमुळे राष्ट्रवादी अडचणीत असली, तरी या काळात आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. गेल्या १५ वर्षांपासून आम्ही एकत्रित काम करीत आहोत. त्यामुळे या दोन्ही मित्रपक्षांनी एकमेकांना प्रामाणिकपणे साथ दिली, तरच भविष्यकाळ चांगला आहे, अन्यथा दोघेही अडचणीत येतील. जागा बदलाबाबत ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघ पूर्वी आमचाच होता. आमच्याच दुर्लक्षामुळे ती जागा राष्ट्रवादीकडे गेली. आता जागा बदलाबाबत वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

पुणे की सांगली ?
शेवटची विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर करताना पतंगरावांनी ‘विधानसभेची’ या शब्दावर जोर दिला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. तरीही मतदारसंघ कोणता असेल ते पुढील काळात ठरवू, असे त्यांनी सांगितले. सांगली किंवा पुणे लोकसभा मतदारसंघ त्यांच्या डोळ्यासमोर असेल, असे कदम यांच्या काही निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले.
विश्वजित कदम यांना संधी
--शेवटची विधानसभा निवडणूक लढवून पतंगरावांचा हक्काचा मतदारसंघ असलेल्या कडेगाव-पलूस या मतदारसंघात विश्वजित कदम यांना उतरविण्याचेही संकेत यानिमित्ताने मिळाले. अद्याप याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नसली, तरी आज दिवसभर कदम यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या या घोषणेची चर्चा व तर्कवितर्क सुरू होते.

Web Title: Last election of Kangarwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.