खोपोली एसटी स्थानक मोजतेय शेवटची घटका
By Admin | Updated: May 12, 2015 22:47 IST2015-05-12T22:47:54+5:302015-05-12T22:47:54+5:30
मुंबई-पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खोपोलीमधील एसटीचे स्थानक शेवटची घटका मोजत आहे. एकेकाळी प्रवाशांनी गजबजलेल्या स्थानकातून

खोपोली एसटी स्थानक मोजतेय शेवटची घटका
खालापूर : मुंबई-पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खोपोलीमधील एसटीचे स्थानक शेवटची घटका मोजत आहे. एकेकाळी प्रवाशांनी गजबजलेल्या स्थानकातून हजारो प्रवाशी दररोज प्रवास करायचे, मात्र एक्स्प्रेस-वेच्या निर्मितीनंतर एसटीची वाहतूक काही प्रमाणात कमी झाली असली तरी आजही मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असताना स्थानकात म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध नाहीत. उलट अनेक गैरसोयी निर्माण होऊन प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
प्रवाशी संघटनेकडून सतत पाठपुरावा, वृत्तपत्रांतून वारंवार समस्यांबाबत प्रसिद्ध झालेली वृत्ते या सर्वांना परिवहन विभागाने केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे. खोपोली एसटी स्थानक सतत दुर्लक्षित राहिले असून मागील वर्षी ज्या समस्या येथे होत्या त्याच समस्या आजही कायम आहेत.
अपुरी सुविधा असलेले निवारा शेड, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, स्थानक परिसरातील अस्वच्छता, स्वच्छतागृहाची बिघडलेली स्थिती, डांबर उखडल्याने उडणाऱ्या धुराड्यामुळे येथील प्रवासी वैतागले आहेत. खोपोली एसटी स्थानकात सोयी-सुविधा निर्माण व्हाव्यात तसेच खोपोलीमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या सर्व बसेस थांबाव्यात यासाठी पांडुरंग दळवी यांच्या नेतृत्वाखाली खोपोली प्रवासी संघटना पेण आगार प्रमुख, कर्जत आगार प्रमुख तसेच राज्य परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकारीवर्गाशी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत आहेत. मात्र मागील वर्षी येथे ज्या समस्या होत्या त्यात काहीच सुधारणा न झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)