रेमडेसिविर सरसकट दिले जात असल्याने मोठा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:07 AM2021-04-13T04:07:01+5:302021-04-13T04:07:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शन हे औषध कोविड रुग्णांसाठी वापरण्यास शासनाची परवानगी आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी ...

Large shortage as remedicivir is being given all over | रेमडेसिविर सरसकट दिले जात असल्याने मोठा तुटवडा

रेमडेसिविर सरसकट दिले जात असल्याने मोठा तुटवडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शन हे औषध कोविड रुग्णांसाठी वापरण्यास शासनाची परवानगी आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार गरजूंना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी काटेकोरपणे दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले असतानाच रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सरसकट हे इंजेक्शन दिले जात असल्याने याचा मोठ्या प्रमाणात तुटवटा निर्माण झाला आहे, अशी माहिती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. एखादा रुग्ण औषधांनी बरा होणार असेल तर त्याला इंजेक्शन देण्याची आवश्यकता नाही. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासू नये, यासाठी हा उपाय उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. सना शेख यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत सध्या प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असताना आता कोरोनावर वैद्यकीय उपचारासाठी उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा राज्यभरात तुटवडा जाणवू लागला आहे. रेमडेसिविर हे जीवरक्षक इंजेक्शन असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची यासाठी धावाधाव सुरू आहे. औषध विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर नातेवाइकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. २०१४ मध्ये आलेल्या इबोला या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. या रुग्णांसाठी प्रभावी औषध म्हणून रेमडेसिविरचा वापर करण्यात आला होता. अन्न व औषध प्रशासन (एफडीए)द्वारे या इंजेक्शनला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार आता कोरोना रुग्णांसाठीही हे इंजेक्शन वापरले जात आहे. परंतु, रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी सरसकट हे इंजेक्शन दिले जात असल्याने याचा मोठ्या प्रमाणात तुटवटा निर्माण झाला आहे.

-------------------

घाबरून जाऊ नये

रुग्णांच्या नातेवाइकांनी घाबरून न जाता डॉक्टरांशी चर्चा करून गरज भासल्यास इंजेक्शन द्या. एखादा रुग्ण औषधांनी बरा होणार असेल तर त्याला इंजेक्शन देण्याची आवश्यकता नाही. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासू नये, यासाठी हा उपाय उपयुक्त ठरेल. याशिवाय इंजेक्शनची मागणीही कमी होईल. तसेच नियमित हात स्वच्छ धुणे, मास्कचा वापर करणे आणि सामाजिक अंतर राखणे यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. कारण, इंजेक्शन तयार करणे आणि वितरण करणे अधिक त्रासदायक काम आहे. कारण त्यात अधिक मानवी श्रम आणि वेळ लागतो.

- डॉ. सना शेख

-------------------

महापालिकेच्या रुग्णालयात रेमडेसिविर तुटवडा नाही

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा राज्यभरात तुटवडा जाणवत आहे, हे ऐकण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात ही समस्या अधिक उद्भवते. त्यामुळे यावर काय उपाय करता येईल याबाबत ठरवणे गरजेचे आहे. परंतु महापालिकेच्या रुग्णालयात अद्यापही रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा नाही. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोविड रुग्णांना आवश्यकतेनुसार हे इंजेक्शन दिले जात आहे.

- डॉ. मिलिंद नाडकर, प्रमुख, औषधी वैद्यकशास्त्र, केईएम रुग्णालय

-------------------

औषध मिळवून देण्यास मदत

ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा त्यांचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध कार्यालयाच्या जिल्हा कार्यालयास अथवा प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांना औषध मिळवून देण्यास निश्चित मदत केली जाईल व काळाबाजार करणाऱ्या विरुध्द कडक कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.

-------------------

इंजेक्शन मिळणे बंद; पण आता...

रेमेडेसिविर इंजेक्शन रुग्णालयेच पुरवणार असल्याने आता मुंबईतील रुग्णालयांमध्ये देखील इंजेक्शन मिळू लागले आहेत. चेंबूर परिसरातील मेडिकलमध्ये काही दिवसांपूर्वीच हे इंजेक्शन मिळणे बंद झाले होते. याआधी देखील कोरोना बाधित रुग्णालाच हे इंजेक्शन देण्यात येत होते. तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय हे इंजेक्शन देण्यात येत नव्हते. असे मेडिकल चालकांचे म्हणणे आहे आहे. विविध ब्रँडच्या इंजेक्शनच्या किमती वेगवेगळ्या असल्याने काहीजण काळाबाजार रुग्णांच्या नातेवाइकांची फसवणूक करत होते. परंतु आता रुग्णालयातून हे इंजेक्शन गरजू रुग्णांना मिळत आहेत.

-------------------

नातेवाइकांची ससेहोलपट

रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी दररोज वाढतच चालली आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे. खुल्या बाजारामध्ये इंजेक्शन मिळत नसल्यामुळे मात्र कोविड रुग्ण तसेच नातेवाइकांची ससेहोलपट होत आहे. खूप ठिकाणाहून इंजेक्शनची मागणी होत आहे. मात्र टंचाई मोठ्या प्रमाणात होत आहे. रुग्णांना तसेच नातेवाइकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. मेडिकलमध्ये रेमडेसिविर मिळत नाही आहे. एक वर्षापूर्वी काळाबाजार होत होता. मात्र आता यामध्ये कमी आली आहे.

-------------------

Web Title: Large shortage as remedicivir is being given all over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.