भूमाफियांची दादागिरी सुरूच
By Admin | Updated: June 1, 2015 02:15 IST2015-06-01T02:15:25+5:302015-06-01T02:15:25+5:30
राजकीय दबाव झुगारून सिडकोने गाव-गावठाण आणि नोडल भागात उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे

भूमाफियांची दादागिरी सुरूच
कमलाकर कांबळे, नवी मुंबई
राजकीय दबाव झुगारून सिडकोने गाव-गावठाण आणि नोडल भागात उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र या कारवाईला भीक न घालता भूमाफियांनी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्याचे ऐरोली येथील दुर्घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
ऐरोली सेक्टर १, शिवकॉलनी येथे एका बेकायदा इमारतीची पायाभरणी करताना शेजारच्या इमारतीची भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या निमित्ताने सिडकोच्या आवाहनानंतरही शहरात भूमाफियांची दादागिरी सुरूच असल्याचे उघड झाले आहे. अनधिकृत बांधकामांमुळे शहराचे सुनियोजन रसातळाला गेले आहे. गाव -गावठाणात भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. दाटीवाटीने उभारलेल्या या इमारतींमुळे अत्यावश्यक सुविधांचा बोजवारा उडाला आहे. रातोरात उभारल्या जाणाऱ्या या इमारतींच्या बांधकामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर सिडकोने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१२ नंतर उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी दाखविलेल्या एकीच्या बळाला न जुमानता सिडकोने ही कारवाई मोहीम सुरूच ठेवल्याने भूमाफियांच्या कारवायांना आता तरी आळा बसेल, असे सर्वसामान्यांना वाटत होते. मात्र राजकीय पुढारी, प्रशासनातील संबंधित अधिकारी आणि स्थानिक पोलीस यांच्यातील अर्थपूर्ण मैत्रीतून पोसल्या गेलेल्या या प्रवृत्तींनी या अपेक्षा फोल ठरवित बेकायदा बांधकामांचा धडाका सुरूच ठेवल्याचे रविवारच्या घटनेवरून दिसून आले आहे. सध्याच्या परिस्थितीत ऐरोलीतील ही घटना प्रातिनिधिक असली तरी शहरात आजही मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. गाव -गावठाणात फिफ्टी-फिफ्टीच्या बांधकामांचा वेग जैसे थे आहे.
सिडकोने गेल्या आठवड्यात गोठीवली गावात कारवाई करून दोन बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्या. मात्र या परिसरात आजही मोठ्याप्रमाणात बांधकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे येथील एका बालाजी टॉवर या पाच मजली अनधिकृत इमारतीत मागील दोन वर्षापासून लोक राहतात. मात्र संबंधित विकासकाने आता या इमारतीवर आणखी तीन मजले चढविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे इमारतीला मोठा अपघात होण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. गोठीवलीप्रमाणेच कोपरखैरणे येथे महावितरण कार्यालयाच्या मागच्या बाजूला जुन्या चाळी तोडून तेथे बहुमजली इमारत उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
कोपरखैरणे गावातील एका प्रकल्पग्रस्त नेत्याची ही इमारत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे वॉर्ड कार्यालयाच्या मागच्या बाजूला सेक्टर ६ मध्ये एक सात मजल्याच्या इमारतीचे काम अलिकडेच पूर्ण झाले आहे. या इमारतीच्या जवळच आणखी एक फिफ्टी-फिफ्टीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. ही दोन्ही बांधकामे याच परिसरातील राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याची असल्याचे सांगण्यात येते. घणसोली, कोपरी, जुहूगाव, सानपाडा तसेच ऐरोली, रबाले, दिघा या विभागात आजही अनधिकृत बांधकामे तेजीत सुरू असल्याचे दिसून येते.