रेती उपशामुळे जमिनी नापीक
By Admin | Updated: July 14, 2015 23:02 IST2015-07-14T23:02:30+5:302015-07-14T23:02:30+5:30
एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे मानवनिर्मित संकट अशा कात्रित वसई विरार पुर्व भागातील शेतकरी सापडला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे भातशेती

रेती उपशामुळे जमिनी नापीक
वसई : एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे मानवनिर्मित संकट अशा कात्रित वसई विरार पुर्व भागातील शेतकरी सापडला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे भातशेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तर दुसरीकडे शेतीच्या परिसरात होणारा रेतीउपसा शेतीक्षेत्राला मारक ठरू लागला आहे. जिल्ह्यात सक्शन पंपाद्वारे रेतीउपसा करण्यास बंदी असताना आज तालुक्याच्या पुर्व भागात सुमारे २ ते ३ हजार सक्शन पंप अहोरात्र रेतीउपसा करीत आहेत. कालांतराने पुर्व भागामध्ये खाडीपात्राची दिशा बदलून पावसाळ्यात ही गावे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
गेल्या ३ वर्षापासुन राज्यशासनाच्या महसूल विभागाने रेती वाहतूक परवाने स्थगित ठेवल्यामुळे चोरट्या रेतीवाहतुकीला उधाण आले आहे. एकेकाळी पारंपारीक पद्धतीने रेतीउपसा करून भुमीपुत्र आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवित असत. कालांतराने या क्षेत्रात सक्शन पंपाचा शिरकाव झाला व प्रचंड प्रमाणात रेतीउपसा होऊ लागला. १० वर्षापुर्वी पारोळ, शिरवली गावाच्या परिसरात सतत रेतीउपसा होत राहील्यामुळे पावसाळ्यामध्ये हा संपुर्ण परिसर पाण्याखाली गेला होता. सुमारे ३ दिवस येथील गावे पाण्याखाली गेली होती. तर अनेक गावांचा तालुक्याशी असलेला संपर्कही तुटला होता. आजही हा उपसा दिवसरात्र सुरू आहे. अशा उपशामुळे चिमणे गावातील शेतजमीनही नापीक झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. (प्रतिनिधी)