ललित टेकचंदानी याचा अँम्बीव्हॅलीतील बंगला जप्त
By मनोज गडनीस | Updated: April 18, 2024 20:12 IST2024-04-18T20:11:59+5:302024-04-18T20:12:08+5:30
- ११३ कोटींच्या मुदतठेवीही जप्त, ईडीची कारवाई

ललित टेकचंदानी याचा अँम्बीव्हॅलीतील बंगला जप्त
मुंबई - नवी मुंबईमधील तळोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पात सर्वसामान्य लोकांची फसवूणक केल्याप्रकरणी विकासक ललित टेकचंदानी याचा लोणावळानजिकच्या अँम्बिव्हॅलीतील एक बंगला, ११३ कोटी रुपयांच्या मुदतठेवी, रायगड जिल्ह्यातील भूखंड, काही फ्लॅट्स अशी कोट्यवधींची मालमत्ता ईडीने गुरुवारी जप्त केली आहे. टेकचंदानी याला १८ मार्च रोजी ईडीने अटक केली आहे. यापूर्वी टेकचंदानी याची ४३ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
ललित टेकचंदानी याच्या सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीने तळोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू केले होते. या प्रकल्पात घरे घेऊ इच्छिणाऱ्या १८०० लोकांकडून एकूण ४०० कोटी रुपये जमा केले होते. मात्र या प्रकल्पाला बराच विलंब झाला. तसेच टेकचंदानी याने लोकांना पैसेही परत केले नाही.
याउलट या सर्वसामान्य लोकांकडून जमा केलेल्या रकमेचा अपहार करत ती वैयक्तिक लाभासाठी वापरल्याचा ठपका ईडीने त्याच्यावर ठेवला आहे. या प्रकल्पात घराचे बुकिंग करत लाखो रुपये गुंतवलेल्या चेंबूर येथील एका रहिवाशाने टेकचंदानी याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. फसवणुकीद्वारे मिळवलेल्या पैशांतून त्याने व्यक्तीगत लाभासाठी या मालमत्तांची खरेदी केल्याचा ठपका ईडीने त्याच्यावर ठेवला आहे.