Join us  

लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 6:30 AM

परवेझला फाशी झाली असली तरी ती उच्च न्यायालयाकडून निश्चित केली जाईल. फेब्रुवारी २०११ मध्ये लैला, तिची आई आणि चार भावंडांची हत्या त्या राहत असलेल्या इगतपुरी येथील बंगल्यावर करण्यात आली. लैलाची आई सेलिनाशी परवेझचे प्राॅपर्टीवरून वाद झाल्याने त्याने सेलिनाची हत्या केली. 

मुंबई :  अभिनेत्री लैला खान, तिची आई आणि चार भावंडांची २०११ मध्ये हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने शुक्रवारी तिच्या सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा ठोठावली. या सर्वांची हत्या तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला  ९ मे रोजी दोषी ठरविले होते. न्या. एस. बी. पवार यांनी परवेझ टाक याने केलेला गुन्हा ‘दुर्मिळातला दुर्मिळ’ आहे, असे म्हणत फाशीची शिक्षा ठोठावली. पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सात वर्षे कारवासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडही ठोठावला. 

परवेझला फाशी झाली असली तरी ती उच्च न्यायालयाकडून निश्चित केली जाईल. फेब्रुवारी २०११ मध्ये लैला, तिची आई आणि चार भावंडांची हत्या त्या राहत असलेल्या इगतपुरी येथील बंगल्यावर करण्यात आली. लैलाची आई सेलिनाशी परवेझचे प्राॅपर्टीवरून वाद झाल्याने त्याने सेलिनाची हत्या केली. 

सर्व हत्या पूर्वनियोजित, शवांची लावली विल्हेवाट- विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याप्रकरणी ४५ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. सेलिना आणि मुली आपल्याला नोकरासारखे वागवित आहेत आणि त्या आपल्याला सोडून दुबईला जातील, अशी भीती परवेझला होती, असे निकम यांनी न्यायालयाला युक्तिवादादरम्यान सांगितले. 

- सहाजणांची हत्या करणाऱ्या परवेझला एका गुन्ह्यासंबंधी जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. त्यानंतर सर्वांचे मृतदेह लैला खानच्या फार्म हाऊसमधून जप्त करण्यात आले.

- आरोपीला दोषी ठरवेपर्यंत ॲड. निकम यांनी कामकाज पाहिले. त्यानंतर निकम लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिल्यानंतर ॲड. पंकज चव्हाण यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. 

- या सर्व हत्या पूर्वनियोजित होत्या. एकाच कुुटुंबातील सहाजणांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि शवांचीही विल्हेवाट लावण्यात आली, असे चव्हाण यांनी न्यायालयाला सांगितले. तर टाक याने आपला परिवार असून, त्यांची जबाबदारी आपल्यावर असल्याने शिक्षेत दया दाखविण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने त्यास नकार देत त्याला फाशीची शिक्षा ठोठावली. 

टॅग्स :न्यायालयगुन्हेगारी