पर्जन्यवृक्षांना लेडीबगची संजीवनी
By Admin | Updated: February 15, 2015 00:17 IST2015-02-15T00:17:12+5:302015-02-15T00:17:12+5:30
पर्जन्यवृक्षांचा बळी घेणाऱ्या मिलीबग या किड्याचा नायनाट करण्यासाठी लेडीबग सोडण्याचा प्रयोग दादर पश्चिम येथील शिवाजी पार्कवर मनसेने आज केला़

पर्जन्यवृक्षांना लेडीबगची संजीवनी
मुंबई : पर्जन्यवृक्षांचा बळी घेणाऱ्या मिलीबग या किड्याचा नायनाट करण्यासाठी लेडीबग सोडण्याचा प्रयोग दादर पश्चिम येथील शिवाजी पार्कवर मनसेने आज केला़ दादरचा किल्ला सर केल्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग, साफसफाई अभियान आणि पर्जन्य वृक्षांवरील मोहीम हा तिसरा प्रयोग करीत मनसेने शिवसेनेला दणका दिला आहे़ या मोहिमेचे नेतृत्व करीत राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे याने आज राजकारणात पहिले पाऊल टाकले़
मुंबईतील समस्या हाताळतच राजकीय कारकीर्द उभी राहते़ याची चांगली जाण असल्याने राज ठाकरे यांनी २०१७ च्या पालिका निवडणुकांपूर्वी अमितला राजकीय धडे देण्यास सुरुवात केली आहे़ त्यानुसार काही दिवसांपूर्वी अमितने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेऊन पर्जन्यवृक्षांवरील प्रयोगाची परवानगी घेतली़ या प्रयोगात सत्ताधारी शिवसेनेचा अडथळा येऊ नये, म्हणून ही पूर्वपरवानगी घेण्यात आल्याचे मनसेच्या गोटातून समजते़
त्यानुसार आज सकाळी साडेसहाच्या सुमारास पालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि तज्ज्ञांबरोबरच मनसेचे नेते शिवाजी पार्कवर अवतरले़ तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मैदानातील चार पर्जन्यवृक्षांवर लेडीबग ही किड सोडण्यात आली़ हा प्रयोग यशस्वी ठरून वृक्ष वाचल्यास उर्वरित वृक्षांवरही हा प्रयत्न केला जाईल, असे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी या वेळी सांगितले़ (प्रतिनिधी)
च्मिलीबग या किड्याला मारण्यासाठी लेडीबग हा किडा परिणामकारक आहे़ मात्र हा किडा बंगलोर अथवा परदेशात सापडतो़ बंगळुरू येथे एक किडा चार ते पाच रुपयांत मिळतो़
च्एका वृक्षावर शंभर किडे प्रभावकारक ठरू शकतील़ शिवाजी पार्कमधील पर्जन्यवृक्षांवर प्रत्येकी १०० ते १५० लेडीबग सोडण्यात आले़ या प्रयोगासाठी सहाशे लेडीबग आणण्यात आले आहेत़
किडच नव्हे, काँक्रिटीकरणही जबाबदार
गोरेगाव पश्चिम, मालाड, अंधेरी येथील डी़एऩ नगर अशा ठिकाणी असलेल्या ६११ पर्जन्यवृक्षांचा सर्वेक्षण अहवाल पालिका आयुक्तांना सादर करण्यात आला होता़ त्यानुसार मिलीबगमुळेच नव्हे तर वाहतूक प्रदूषण, काँक्रीटचे रस्ते आणि पावसाळ्यापूर्वी होणारी वृक्षांच्या फांद्यांची छाटणीही जबाबदार असल्याचे उजेडात आले आहे़ वृक्षांची मुळे सिमेंट काँक्रीटखाली पुरली गेल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे़