रवींद्र घरत, लोकमत न्यूज नेटवर्क, सफाळे: पालघर तालुक्यातील सफाळे-पालघर रस्त्यावर मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातून १०८ रुग्णवाहिका विधी विकी सांबरे (२५) या गर्भवतीला घेऊन प्रसूतीसाठी पालघर येथे निघाली होती. पालघरच्या माहीम येथे रुग्णवाहिका येताच प्रसूतिकळा वाढल्या. रुग्णालय गाठण्यास वेळ लागू शकतो हे लक्षात घेत रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवत रस्त्याच्या कडेला रुग्णवाहिका थांबविण्यास सांगून तेथे महिलेची सुखरूप प्रसूती केली.
करवाळे पाटील पाडा, येथील विधी सांबरे या गर्भवतीला सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी काही कारण देत प्रसूतीसाठी पुढे जाण्यास सांगितले. त्यानंतर १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला.
सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिकेत कार्यरत असणाऱ्या डॉ. रुक्साना शेख यांना सोबत घेऊन रुग्णवाहिका पालघरच्या दिशेने निघाली. माहीमजवळ आल्यानंतर त्या महिलेच्य प्रसूतिकळा अधिक तीव्र होऊ लागल्या. त्यामुळे चालक सचिन भोईर यांना रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला घेण्याच्या सल्ला डॉक्टर शेख यांनी दिला.
‘प्राथमिक आरोग्य केंद्रात कुठलीही कारणं देतात’
डॉक्टर शेख यांनी प्रसंगावधान दाखवत त्या महिलेची यशस्वी प्रसूती केली. त्या महिलेने कन्येला जन्म दिला. त्यानंतर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. कन्येचे वजन २.८०० ग्रॅम असल्याची माहिती डॉ. शेख यांनी ‘लोकमत’ला दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रात कुठलेही कारण सांगितले जाते, मग रस्त्यात सुखरूप प्रसूती कशी होते, असा सवाल त्या महिलेच्या वडिलांकडून केला जात आहे.