डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिडीचे वाहन उपलब्ध
By जयंत होवाळ | Updated: April 13, 2024 18:33 IST2024-04-13T18:33:24+5:302024-04-13T18:33:43+5:30
शिडी असलेले वाहन हवे असल्यास अनामत रक्कम आणि शुल्क भरावे लागेल, असे अग्निशमन दल मुख्यालयाने एम-पश्चिम विभागाला कळले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिडीचे वाहन उपलब्ध
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चेंबूर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले अग्निशमन दलाचे उंच शिडीचे वाहन महानगरपालिकेच्या एम - पश्चिम या विभागीय कार्यालयास उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली आहे. १३ एप्रिल रोजी रात्री बारा वाजता वाहन उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे पालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शिडी असलेले वाहन हवे असल्यास अनामत रक्कम आणि शुल्क भरावे लागेल, असे अग्निशमन दल मुख्यालयाने एम-पश्चिम विभागाला कळले होते. वास्तविक पाहता हे वाहन दरवर्षी विनाशुल्क दिले जाते. २०१३ साली तत्कालीन पालिका आयुक्तांनी वाहन विनाशुल्क उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. यंदा मात्र शुल्क आकारणी करण्यास सांगण्यात आले होते. यासंदर्भातील वृत्त 'लोकमत'च्या शनिवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यावर पालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. शुल्क आकारणीबाबत बृहन्मुंबई महापालिका एससी, एसटी, व्हीजेएनटी,एसबीसी, ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशनने नाराजी व्यक्त करत वाहन विनाशुल्क उपलब्ध करून देण्यासाठी आयुक्त भूषण गगराणी यांना विनंती केली होती.