Join us  

संभाव्य पाणी संकटासाठी पालिकेकडे नियोजनाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 12:58 AM

परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १५ टक्के जलसाठा कमी आहे. याचा फटका अनेक भागांतील रहिवाशांना बसत आहे.

मुंबई : परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १५ टक्के जलसाठा कमी आहे. याचा फटका अनेक भागांतील रहिवाशांना बसत आहे. पालिका प्रशासनाने अघोषित पाणीकपात लागू केल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत केला. मात्र, मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कपात केली नसल्याचा दावा जल अभियंता खात्याने केला, परंतु संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कोणते नियोजन केले आहे? अशा विरोधी पक्षाच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सत्ताधारी आणि पहारेकरी ‘ब्र’ही काढत नसल्याचे पाहून विरोधकांनी सभात्याग केला.१ आॅक्टोबरला तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. मात्र, अपुºया पावसामुळे मुंबईचा वर्षभराचा जलसाठा तलावांमध्ये जमा झालेला नाही. यामुळे उन्हाळ्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही याबाबत महापालिका प्रशासन कोणतीही माहिती देत नसल्याने, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे प्रशासनाला जाब विचारला. मुंबईत अघोषित पाणीकपात सुरू आहे, दिवाळी सणानंतर यामध्ये वाढ होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मुद्द्यांचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन करीत, पाणीटंचाईमुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. जुन्या विहिरींची सफाई करावी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, समुद्राचे पाणी गोड करणे, पाण्याची गळती थांबविणे अशा अनेक प्रयोगांची सद्यस्थिती, तसेच ते पुन्हा सुरू करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता, दूरगामी उपाययोजना कराव्या, संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेने काय नियोजन केले आहे? असे अनेक सवाल नगरसेवकांनी उपस्थित केले. मात्र, मुंबईत कोणतीही पाणीकपात नाही. दररोज ३,८०० दशलक्ष लीटरहून अधिक पाणीपुरवठा होत आहे. मधल्या काळात काही तांत्रिक बिघाडामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली होती, पण आता पाणीकपात नाही, असे मोघम स्पष्टीकरण जल अभियंता अशोककुमार तवाडिया यांनी स्थायी समितीत दिले. मात्र, नियोजनावर कोणतीच माहिती न दिल्याने नाराज विरोधी पक्षांनी सभात्याग केला.दक्षिण मुंबईत दूषित पाण्याची तक्रारपाणीटंचाईचा मोठा फटका दक्षिण मुंबईला बसला आहे. मोहम्मद अली रोड, भायखळा या विभागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाण्याची गळती शोधून रोखण्यात पालिकेला यश आलेले नाही, असा आरोप समाजवादीचे गटनेते राईस शेख यांनी केला.वापरावर निर्बंधाची मागणीपिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणारे पंचतारांकित हॉटेल, बांधकाम, जलतरण तलाव, औद्योगिक व व्यवसायिक कंपन्याच्या पाण्याच्या वापरावर निर्बंध आणावे, अशी मागणी भाजपाचे अभिजीत सामंत यांनी केली.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाणीटंचाईमुंबई