सूचना स्वीकारण्यास लिपिकांची कमतरता
By Admin | Updated: April 20, 2015 01:22 IST2015-04-20T01:22:54+5:302015-04-20T01:22:54+5:30
मुंबईच्या विकास आराखड्याबाबत सूचना/हरकती देण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले असले तरी विकास आराखड्याबाबत सूचना/ हरकती

सूचना स्वीकारण्यास लिपिकांची कमतरता
मुंबई : मुंबईच्या विकास आराखड्याबाबत सूचना/हरकती देण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले असले तरी विकास आराखड्याबाबत सूचना/ हरकती स्वीकारण्यासाठी चक्क लिपिकांची कमतरता भासत असल्याचे चित्र समोर आले आहे. परिणामी या कामी स्वतंत्र लिपिकवर्ग नेमण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्याने महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यात असंख्य चुका आहेत. प्रार्थनास्थळे, उद्याने, मैदानांसह रस्त्यांबाबत पालिकेने चांगलाचा गोंधळ घातला आहे. या गोंधळावर सेवाभावी संस्थांनी आवाज उठविला असून, राजकीय पक्षांनीदेखील विकास आराखड्याला विरोध दर्शविला आहे. मात्र विकास आराखड्याबाबत महापालिकेने नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या असून, शनिवारी म्हणजे एकाच दिवसांत पालिकेकडे तब्बल २२ हजार हरकती दाखल झाल्या आहेत.
विकास आराखड्याबाबत हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी नागरिकांची रांग लागली असतानाच दुसरीकडे मात्र या हरकती आणि सूचना स्वीकारण्यासाठी पालिकेच्या लिपिकांची संख्या कमी पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे हरकती आणि सूचना स्वीकारण्याचे कामकाज केवळ दोन लिपिकांवर सुरू आहे. परिणामी नागरिकांना हरकती व सूचना दाखल करताना समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यात याच हरकती व सूचनांची संगणकावर नोंदणी करताना आणखी दमछाक होणार आहे.
परिणामी याकामी १० लिपिकांची गरज असताना दोन लिपिकांवरच हे काम टाकून नागरिकांना त्रास देऊ नये, अशी विनंती अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली यांनी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)