Join us  

केईएम रुग्णालयात कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा, आठवड्याभरात होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 5:07 AM

या प्रयोगशाळेत कोरोनाविषयक चाचणी करण्यात येणार असून, आठवड्याभरात ही प्रयोगशाळा कार्यान्वित होईल, असेही पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

मुंबई : कोरोना आजाराची चाचणी करण्यासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात वैद्यकीय प्रयोगशाळा सुरू करणार असल्याची माहिती शनिवारी पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या प्रयोगशाळेत कोरोनाविषयक चाचणी करण्यात येणार असून, आठवड्याभरात ही प्रयोगशाळा कार्यान्वित होईल, असेही पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.अंधेरी येथील सेव्हन हिल्स या खासगी रुग्णालयात ३०० खाटांचा विलगीकरण कक्ष कार्यान्वित आहे. शहर उपनगरांत २४ विभागांत ६६७ आरोग्यविषयक चमू कोरोना (कोविड - १९) विषयी जनजागृती करत आहे. आतापर्यंत २,९१२ निवासी वसाहतींमध्ये प्रवासाचा इतिहास असलेल्या नागरिकांविषयी तपासणी करण्यात आली आहे. प्रवासाचा इतिहास असलेल्यांसह त्यांच्या निकटवर्तीयांचीही तपासणी करण्यात येत आहे.१४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झालेले रुग्ण - ९८९कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत दाखल झालेले संशयित रुग्ण - ३२०कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेल्यांची संख्या - २५८अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करावीकोरोना व्हायरसबाबत चुकीची माहिती, सूचना व चुकीच्या परिपत्रकांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा अफवांचा प्रसार होऊ नये, यासाठी संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.खासगी रुग्णालयांतही आता विलगीकरण कक्षमुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे राज्यात शुक्रवार मध्यरात्रीपासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता शासकीय व पालिका रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयांतही विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यामुळे शहर, उपनगरातील प्रमुख खासगी रुग्णालयांत विलगीकरण कक्ष सुरू झाले आहेत.झेन रुग्णालयाचे संचालक डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले, रुग्णालयात विलगीकरण कक्षाच्या सुविधा आहेत. सध्या बाहेरील देशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांना कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यास पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणांच्या निर्देशानुसार निर्बंध पाळण्यात येत आहेत.आरोग्य विभागाच्या वतीने कस्तुरबा रुग्णालयात ७० खाटा, मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात १५ खाटा, बीपीटी रुग्णालयात ५०, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात २०, एचबीटी रुग्णालयात २०, वांद्रे भाभा येथे १० तर कुर्ला भाभा येथे १० खाटा तयार करण्यात आल्या आहेत. भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्य रेल्वे रुग्णालयातही ३० खाटा आहेत. अशा प्रकारे एकूण २३३ खाटांची व्यवस्था आहे.ग्लोबल रुग्णालयाचे क्रिटिकल केअर युनिटचे प्रमुख डॉ. प्रशांत बोराडे म्हणाले, आम्ही विलगीकरण कक्षाची सोय केली आहे. मात्र अजूनही सेवा सुरू झालेली नाही. राज्य शासनाच्या निर्देशानंतर लवकरच कक्ष सुरू ॅहोईल. तर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पालिकेने शहर-उपनगरातील खासगी रुग्णालयांत विलगीकरणाची व्यवस्था वाढविण्याविषयी प्रयत्न सुरू केले आहेत. विलगीकरण कक्षांची संख्या येत्या काही दिवसांत आणखी वाढेल.

टॅग्स :केईएम रुग्णालयमुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस