Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुर्ला स्टेशन ते बीकेसी अवघ्या १५ मिनिटांत; जाणून घ्या प्रवास कसा होणार सुस्साट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 10:33 IST

वाहतूककोंडीला कारण ठरणारी शंभर वर्ष जुनी चाळ जमीनदोस्त होणार

मुंबई: कुर्ला स्थानक ते वांद्रे कुर्ला संकुल यांच्यातलं अंतर आता अवघ्या 15 मिनिटांवर येणार आहे. गर्दीच्या वेळी कुर्ला स्थानक ते वांद्रे-कुर्ला संकुल अंतर कापण्यासाठी तासाभरापेक्षा जास्त कालावधी लागतो. मात्र आता शंभर वर्ष जुनी चाळ पाडली जाणार असल्यानं या भागातून प्रवास करणाऱ्या लाखो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कुर्ला स्थानक ते वांद्रे-कुर्ला संकुल यांच्यादरम्यान शंभर वर्षे जुनी डेविड चाळ आहे. सीताराम भारू मार्गावर असणाऱ्या या चाळीमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ही चाळ पाडून रस्त्यांचं रुंदीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी कित्येक वर्षांपासून पालिका आणि दगडी चाळीतील रहिवासी यांच्यात चर्चा सुरू होती. अखेर या रहिवाशांचं जवळच असणाऱ्या एसआरए इमारतीत पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीकेसीला जात असताना आधी एलबीएस मार्ग येतो. त्याआधी येणाऱ्या डेविड चाळीत 37 कुटुंबांशिवाय 17 आस्थापनं आहेत. डेविड चाळीवर हातोडा पडल्यानंतर 30 फुटांचा रस्ता 50 फुटांचा करण्यात येईल. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या सुटेल. यासाठी डेविड चाळीतील रहिवाशांसोबत पालिका प्रशासनाची गेल्या 19 वर्षांपासून चर्चा सुरू होती. 2000 सालापासून डेविड चाळ हटवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र स्थानिकांनी 100 मीटर परिसरात पुनर्वसन करण्याची मागणी केल्यानं हा विषय प्रलंबित राहिला होता. डेविड चाळ हटवल्यानंतर प्रवास वेगवान होईल, अशी माहिती एल विभागाचे सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू यांनी दिली. 'कुर्ल्याला उतरणाऱ्या किंवा तिथून ट्रेन पकडणाऱ्यांची संख्या 30 लाखांच्या घरात आहे. यातील अनेकजण बीकेसी, वांद्रे किंवा खारला जातात. वाहतूक कोंडीमुळे हा प्रवास अतिशय भीषण ठरतो,' असं वळंजू म्हणाले. डेविड चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुढील आठवड्यात मार्गी लावू. जवळच्याच एका एसआरए इमारतीत त्यांच्या राहण्याची सोय केली जाईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.  

टॅग्स :वाहतूक कोंडीमुंबई महानगरपालिका