Kundavada 'Kandamara' for the growth of Revenue? | महसूल वाढीसाठी कोंडवाड्यात गुरांचा ‘कोंडमारा’?
महसूल वाढीसाठी कोंडवाड्यात गुरांचा ‘कोंडमारा’?

गौरी टेंबकर - कलगुटकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रभादेवी परिसरातून गोठ्यात बांधलेली जनावरे गुरांचा कोंडवाडा विभागाने बळजबरीने नेली. गेल्या शनिवारी हा प्रकार घडला असून, अद्याप त्यांना सोडविण्यासाठी आवश्यक असलेले आरोपपत्र संबंधित अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेले नाही. परिणामी, महसूल वाढविण्यासाठी विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या जनावरांसोबत सुदृढ गुरांना ठेवून त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप जनावरांच्या मालकांकडून करण्यात येत आहे.


प्रभादेवीमध्ये पृथ्वी इंप्रॉपर परिसरात असलेल्या अरविंद भिकाजी दळवी यांच्या कम्पाउंडजवळच्या सहा गायी कोंडवाडा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ११ मे रोजी बळजबरीने सोडवून गाडीत भरल्या. मात्र त्या गायी सोडविण्यासाठी आवश्यक असलेले आरोपपत्र अद्याप न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेले नाही. परिणामी, त्यांच्या सुदृढ गुरांना विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या जनावरांसोबत राहावे लागत आहे, असा आरोप दळवी यांनी केला आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाºयांशी बोलणी केली असता जबाबदारी एकमेकांच्या अंगावर ढकलून ते बाजूला होत असल्याचेही दळवी यांचे म्हणणे आहे. तर जितके जास्त दिवस जनावरे कोंडवाड्यात राहतील, तितका प्रत्येक जनावराच्या मागे मिळणारा महसूल वाढत जातो, त्यामुळेच जनावरे सोडण्यात दिरंगाई केली जात असल्याचे गोरक्षक एनजीओचे सदस्य राजेश मंत्री यांनी सांगितले.

मुळात कोंडवाड्यामध्ये जनावरांची होणारी दुरवस्था यापूर्वीदेखील ‘लोकमत’ने वाचकांसमोर आणली होती. ‘गुरांच्या कोंडवाड्यात गुरांचे हाल’ या मथळ्याखाली १८ एप्रिल, २०१८ रोजी उपचाराअभावी डोळ्यातून रक्तस्राव होणाºया घोड्यांची अवस्था उघड करण्यात आली होती. त्यानंतर अन्य माध्यमांनीदेखील हे प्रकरण उचलून धरले होते. दळवी यांच्या प्रकरणाबाबत विचारणा करण्यासाठी कोंडवाड्याचे प्रमुख दिलीप करंजकर यांना फोन केला असता त्यांनी काही उत्तरच दिले नाही. त्यामुळे देवनारमधील वरिष्ठांशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वरिष्ठांकडून याबाबत कायदेशीर सल्लामसलत सुरू असल्याचे सांगण्यात आले.

शेट्टेचा फोनच आला नाही!
‘माझी जनावरे आठवडाभर अडकवण्यात आली आहेत. याबाबत मी देवनारचे प्रमुख डॉ. योगेश शेट्टे यांच्याशी संपर्क केला. तेव्हा, कोंडवाडा सीपीओ दिलीप करंजकर यांना त्यांनी जनावरे सोडण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. त्यामुळे मी करंजकर यांची भेट घेतली. तर शेट्टेकडून अद्याप फोनच आला नाही. त्यानंतर मी तीन वेळा न्यायालयात करंजकरांची प्रतीक्षा केली. मात्र कार्यालयाचे शिफ्टिंग तसेच अन्य कारण देत आठवडाभर त्यांनी जनावरांचे आरोपपत्र रखडवले.


त्यामुळे जवळपास ५० ते ६० हजारांचा भुर्दंड मला नाहक भरावा लागणार आहे.
- अरविंद दळवी, गुरांचे मालक

कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू!
दळवी यांच्या प्रकरणात आम्हाला कायदेशीर सल्ला घेण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले आहेत. रहदारीच्या जागी दळवी जनावरे बांधत असल्याची तक्रार साहाय्यक पालिका आयुक्तांपर्यंत आली असल्याने आरोपपत्र दाखल करण्याबाबत तसेच दळवी यांची जनावरे सोडण्याबाबत आम्ही कायदेतज्ज्ञांशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेऊ.
- डॉ. शिवाली गंगावणे,
पशुवैद्यकीय अधिकारी, देवनार कत्तलखाना


Web Title: Kundavada 'Kandamara' for the growth of Revenue?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.