कुंभयात्रेंकरूची सुरक्षा ऐरणीवर
By Admin | Updated: August 28, 2015 23:27 IST2015-08-28T23:27:28+5:302015-08-28T23:27:28+5:30
२९ आॅगस्ट रोजी नाशिक त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ पर्वणी दरम्यान कसारा रेल्वे स्थानकात होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे सर्वच प्रशासकीय कार्यालयाची दाणादाण उडणार आहे.

कुंभयात्रेंकरूची सुरक्षा ऐरणीवर
कसारा : २९ आॅगस्ट रोजी नाशिक त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ पर्वणी दरम्यान कसारा रेल्वे स्थानकात होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे सर्वच प्रशासकीय कार्यालयाची दाणादाण उडणार आहे. कसारा रेल्वे परिसर, टॅक्सी स्टॅण्ड, अधिकृत बस स्टॅण्ड परिसरात कुंभ यात्रेकरूंसाठी सुविधा देण्यास रेल्वे बांधकाम महामंडळ, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, महावितरण प्रशासक उदासीन असल्याचे चित्र असून यात्रेंकरुची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
शाहीस्नानाची पर्वणी २४ तासांवर आली असतानाही संबंधीत प्रशासनाने कसारा स्थानकावर उतरणाऱ्या यात्रेकरूंसाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षेची उपाय योजना आखली नसल्याने येथे येणाऱ्या हजारो प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शुक्रवारपासून या स्थानकात नाशिक, त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शाहीस्नान तसेच रक्षाबंधन हा योग जुळून आल्याने गर्दीत आणखी वाढ होणार आहे. गर्दीचा अंदाज घेता रेल्वे प्रशासनाने ठाणे-कसारा लोकल वाढविण्या पाठोपाठ, कसारा-नाशिक शटल सेवा सुरू करणे सोयीचे होते. परंतु, उदासिन प्रवासी संघटना, निष्क्रीय रेल्वे अधिकारी यांच्यामुळे या सेवा सुरू झाल्या नाहीत.
कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गात बदल केला आहे. कसारा स्थानकावर उतरुन नासिक-त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी कसारा पश्चिमेकडील धावडोबाबा मंदिरालगत वाहनतळ उभारले असून शहरात अवजड वाहनांना बंदी घातली आहे. प्रवाशांची गैरसोय टळावी यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे.
आमदार, खासदार सुस्तच
कसारा शहर व रेल्वेस्थानक हे नाशिक व मुंबईच्या मध्यभागी आहे. त्यामुळे कुंभमेळा आणि कसारा यास खूप साम्य आहे. कुंभमेळ््यासाठी कसाऱ्यात हजारोने प्रवासी उतरणार आहेत. याचा फायदा रेल्वेसह एसटीलाही होणार आहे. येणाऱ्या प्रवाशांना सोईसुविघा, सुरक्षितता उपलब्ध करूण देण्याचे काम स्थानिक लोकप्रतिनिधींचे असताना देखील या भागातील खासदार कपिल पाटील, आमदार पांडुरंग बरोरा, माजी आमदार दौलत दरोडा यांच्यासह रेल्वे प्रवासी संघटना आजमितीस सुस्त आहेत. एकाही लोकप्रतिनिधींनी या असुविधांचा आढावा घेतलेला नाही.