‘कुकडा तारी बोली’, ‘ढोलिडा ढोल धीमो’वर फेर; गुजराती गाण्यांवर तरुणाई धरतेय ताल
By संजय घावरे | Updated: September 29, 2025 13:16 IST2025-09-29T13:15:38+5:302025-09-29T13:16:04+5:30
मोठ्या दांडियाच्या कार्यक्रमांमध्ये आघाडीच्या गायकांच्या आवाजातील गाण्यांवर तरुण थिरकताना दिसत आहेत.

‘कुकडा तारी बोली’, ‘ढोलिडा ढोल धीमो’वर फेर; गुजराती गाण्यांवर तरुणाई धरतेय ताल
संजय घावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘कुकडा तारी बोली...’, ‘ढोलिडा ढोल धीमो...’ आदी गुजराती हिट गाण्यांवर आबालवृद्ध दांडिया-गरब्याच्या ठेक्यावर ताल धरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मोठ्या दांडियाच्या कार्यक्रमांमध्ये आघाडीच्या गायकांच्या आवाजातील गाण्यांवर तरुण थिरकताना दिसत आहेत. गायक त्यांच्या लोकप्रियतेनुसार एका रात्रीसाठी १० ते १५ हजार रुपयांपासून ५० ते ७५ हजार रुपये मानधन आकारत आहेत. काही दांडियांना सेलिब्रिटींचा तडका असल्याने तिथे गर्दी वाढत आहे. गल्लोगल्ली दांडियामध्ये लाईव्ह म्युझिक ऐवजी स्पीकरवर गाणी लावून फेर धरला जातो.
गरबा म्हटला की, गायिका फाल्गुनी पाठक हे जणू समीकरणच बनले आहे. याखेरीज गीता राबारी, भूमी त्रिवेदी, किंजल दवे, कीर्तीदान गढवी, आदित्य गढवी, पार्थिव गोहिल हे गायकही गरब्यासाठी लोकप्रिय आहेत. फाल्गुनीने ‘बीकेसी’त दांडियाचा खेळ मांडला आहे. अनोख्या गायन शैलीच्या बळावर ती हा खेळ उत्तरोत्तर रंगवते. लाइव्ह शोसाठी अनोखी गरबा पॉड संकल्पना राबविण्यात येत आहे.
‘मराठी गाण्यांवर ठेका’
मुंबईत मराठी दांडियानेही वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते व अजित परब यांच्या पुढाकाराने सुरू असलेला मराठी दांडियाही खूप लोकप्रिय आहे.
परब म्हणाले की, काळानुरूप तंत्रज्ञान बदलले असून, रसिकांच्या आवडीनुसार गाणी सादर करून मनोरंजनासोबत लोकांना दांडियाचा आनंद देत आहोत.
हिंदी-गुजराती गाण्यांना पसंती
‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘ढोली तारो ढोल बाजे...’ हे गाणे गरब्यांमध्ये उत्साह वाढवत आहे. ‘लवयात्री’ चित्रपटातील ‘छोगाडा...’, गोलियों की रासलीला - रामलीलामधील ‘नगाडा संग ढोल...’ आदी हिंदी चित्रपटांतील गाण्यांचे दांडिया बिट्सही धमाल उडवत आहेत. ‘गोरी राधा ने काळो कान...’ आणि ‘मोर बनी थनघट करे...’ या गुजराती गाण्यांसह ‘सनेडो...’ हे लोकगीत, ‘के ओढणी ओढू ओढूने उडी जाए...’ हे पारंपरिक गीत नर्तकांचा उत्साह वाढवत आहे.
१२ जणांसाठी छोटे मंडप
गरबा पॉड म्हणजे १२ जणांनाच गरबा खेळण्यासाठी छोटे मंडप तयार करण्यात आले आहेत. यासाठी आपल्यालाच १२ जणांचा ग्रुप तयार करावा लागतो. त्यामुळे मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांसोबत गरबा खेळण्याचा वेगळाच आनंद मिळतो.