क्रीश, छोटा भीमची धम्माल
By Admin | Updated: August 17, 2014 22:50 IST2014-08-17T22:39:17+5:302014-08-17T22:50:22+5:30
लोकमत बालविकास मंच : ‘कौन बनेल स्मार्ट’या लकी ड्रॉचे बक्षीस वितरण

क्रीश, छोटा भीमची धम्माल
कोल्हापूर : अपंग मुलीला प्रोत्साहन देऊन तीला पायावर उभा करणारा ‘क्रिश’ व राक्षसाच्या तावडीमधून ‘छोटा भीम’ने केलेली मित्रांची सुटका अशा छोट्याशा नाटीकेतून ‘क्रिश व छोटा भीम’ यांनी बालगोपाळांची मने जिंकली. निमित्त होतं ‘लोकमत’ बालविकास मंचतर्फे गतवर्षीच्या सदस्यांसाठी आयोजित ‘कौन बनेल स्मार्ट’ या लकी ड्रॉच्या बक्षीस वितरण समारंभाचे.
राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात शुक्रवारी (दि. १५) दुपारी हा समारंभ झाला. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते ‘कौन बनेल स्मार्ट’ या लकी ड्रॉच्या सोडतीतील एकूण २५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाचे ‘बँक आॅफ इंडिया’ प्रायोजक होते. बक्षीस वितरणानंतर ‘छोटा भीम व क्रिश’यांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
एक अपंग मुलगी असते. तिला आपला भाऊ व वडिलांबरोबर फिरायला जायचे असते. पण, तिचे वडील तिला रागावत भावाला घेऊन जातात त्यामुळे ती रडते. ती रडत असताना तेथे ‘क्रिश’ येतो. या अपंग मुलीला खूश करण्यासाठी क्रिश जादूने सांताक्लॉज, डोरेमॉन, बार्बी डॉल, सोनपरी या आपल्या साथीदारांना तिच्याजवळ आणतो. सर्वजण तिला ‘तू चालू शकतेस’ असे प्रोत्साहन देतात. त्यानंतर ती अपंग मुलगी स्वत:च्या पायावर चालू लागते.
त्यानंतर छोटा भीमने तर अक्षरश: धम्माल केली. छोटा भीमचे मित्र जंगलात फिरण्यासाठी जातात. त्यावेळी त्याच्या मित्रांना राक्षस पकडून ठेवतो व छोटा भीमला मारण्यासाठी बोलावतो. त्यावेळी छोटा भीम राक्षसाबरोबर लढाई करून त्याला मारतो. त्यानंतर छोटा भीम मित्रांची सुटका करतो. या नाटीकेंना बालचमूंनी चांगलीच दाद दिली व एकच जल्लोष केला.
बालविकास मंच सदस्य नोंदणी उद्या (सोमवार)पासून लोकमत शहर कार्यालय कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे.