Join us  

कोरेगाव भीमा हिंसाचार; स्टॅन स्वामी यांच्या वैद्यकीय जामिनाबाबत काेर्टाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 5:43 AM

कोरेगाव भीमा हिंसाचार; एनआयएला उत्तर देण्याचे निर्देश

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार व शहरी नक्षलवादप्रकरणी आरोपी असलेले ८३ वर्षीय स्टॅन स्वामी यांच्या वैद्यकीय जामिनावर एनआयएला नोटीस बजावत त्यांना उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला १५ मेपर्यंत स्वामी यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 

स्वामी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी सांगितले की, स्वामी यांना ऑक्टोबर २०२० मध्ये अटक झाली. ते सध्या तळोजा कारागृहात असून व्याधिग्रस्त आहेत. त्यांना नीट ऐकूही येत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची तात्पुरती जामिनावर सुटका करावी. एनआयएचे वकील संदेश पाटील यांनी सांगितले की, एनआयकडून  यावर सूचना घ्यावी लागेल. वैद्यकीय जामिनासंबंधी अपील करण्यासाठीची १५२ दिवसांची वैधानिक मुदत उलटल्यानंतर स्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. स्वामी यांनी नियमित जामिनासाठीही एक याचिका दाखल केली असून, उच्च न्यायालयाने १४ जूनला सुनावणी ठेवली आहे.

रोना विल्सन यांच्या याचिकेवर सरकारला उत्तर द्यावे लागणार!nरोना विल्सन व शोमा सेन यांनी दाखल केलेल्या याचिकांवर उत्तर देण्याचे निर्देश न्या. एस.एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने दिले.nविल्सन यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी सांगितले की, यूएपीएअंतर्गत कारवाईसाठी २०१८ मध्ये दिलेल्या मंजुरीलाही आव्हान दिले आहे. राज्य सरकारने कारवाई करण्यास परवानगी दिल्याने त्यांनी दोन्ही याचिकांवर उत्तर देणे अपेक्षित आहे. पुढील सुनावणी १६ जून रोजी ठेवली आहे.

टॅग्स :कोरेगाव-भीमा हिंसाचारमुंबई