Join us  

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण; यूएस लॅबच्या अहवालावर एनआयएचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 6:31 AM

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण; उच्च न्यायालयात दाखल केले होते प्रतिज्ञापत्र

ठळक मुद्देआर्सेनिलचा अहवाल आणि ज्या मॅगझिनमध्ये त्याबाबत लेख देण्यात आला, ते मॅगझिन दोषारोपपत्राचा भाग नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार व शहरी नक्षलवाद प्रकरणी अटक करण्यात आलेले रोना विल्सन यांचा लॅपटॉप सायबर हल्लेखोरांनी हॅक करून त्यांच्याविरोधात षडयंत्र रचल्याचा अहवाल अमेरिकनस्थित डिजिटल फॉरेन्सिक फर्म आर्सेनिल कन्सल्टिंगने दिला. या अहवालावर एनआयएने आक्षेप घेतला आहे.एनआयएने शुक्रवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात एनआयएने आर्सेनिलच्या अहवालात करण्यात आलेले दावे फेटाळले आहेत. लॅपटॉपमध्ये घुसखोरी करून आपल्याविरोधात पुरावे पेरण्यात आले आहेत, हा रोना विल्सन यांचा बचाव स्वीकारू शकत नाही, असे एनआयएने प्रतिज्ञापत्रात नमूद केले. अमेरिकेतील फर्मच्या अहवालाच्या आधारावर विल्सन यांची याचिका दाखल करून घेऊ शकत नाही. त्यांची याचिका फेटाळण्यात यावी. मी हा अहवाल नाकारत आहे, असे एनआयए अधिकारी विक्रम झकाते यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

आर्सेनिलचा अहवाल आणि ज्या मॅगझिनमध्ये त्याबाबत लेख देण्यात आला, ते मॅगझिन दोषारोपपत्राचा भाग नाही. तसेच कोणत्या व्यक्तीने लॅपटॉपमध्ये घुसखोरी केली, हे सांगणे कठीण आहे, असे लॅबच्या अहवालात आहे. त्यामुळे हे कृत्य कोणी केले, हे विल्सन यांना खटल्यावेळी समोर आणावे लागेल. कोणी केले? का केले? हे सर्व विल्सन यांनाच सांगावे लागेल. कारण हे पुरावे विल्सन यांच्यावर गुन्हा नोंदवण्यापूर्वी पेरण्यात आले होते, असे एनआयएने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. विल्सन यांच्याकडे गुन्हा रद्द करण्यासाठी सीआरपीसी कलम २२७ आणि २३९ अंतर्गत पर्याय उपलब्ध आहे, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना व खटला प्रलंबित असताना न्यायालयाच्या परवानगीशिवाय आर्सेनिल फर्मने असा अहवाल देणे अपेक्षित नाही. खटल्यास विलंब करण्याचा प्रयत्न विल्सन करत आहेत, असा आरोप प्रतिज्ञापत्राद्वारे करण्यात आला आहे. आर्सेनिलच्या अहवालाच्या आधारावर विल्सन यांनी आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :कोरेगाव-भीमा हिंसाचारन्यायालय