Join us  

कोरेगाव भीमा दंगल प्रकरण: ‘त्या’ नऊ आरोपींची विशेष एनआयए न्यायालयात उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 4:41 AM

केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) दंगलीचा तपास वर्ग केल्यानंतर पहिल्यांदाच सर्व नऊ आरोपींना विशेष एनआयए न्यायालयात आणण्यात आले.

मुंबई : कोरेगाव भीमा दंगल प्रकरण व माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या नऊ आरोपींना शुक्रवारी मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) या दंगलीचा तपास वर्ग केल्यानंतर पहिल्यांदाच सर्व नऊ आरोपींना विशेष एनआयए न्यायालयात आणण्यात आले.कोरेगाव भीमा दंगलीचा तपास पुणे शहर पोलीस करीत असताना जानेवारीमध्ये केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे वर्ग केला. एनआयएने दाखल केलेल्या अर्जावर १४ फेब्रुवारी रोजी पुण्याच्या न्यायालयाने हा खटला मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयात वर्ग करण्याचा आदेश दिला. आरोपींना २८ फेब्रुवारीपर्यंत विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्याचा आदेशही पुणे न्यायालयाने दिला होता.त्यानुसार शुक्रवारी आरोपींना एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. त्यासाठी सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे, वरावरा राव, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, शोमा सेन आणि वेर्नोन गोन्साल्विस या आरोपींना बुधवारीच पुण्याच्या येरवडा कारागृहातून मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात हलविण्यात आले होते.३१ जानेवारी २०१७ रोजी पुण्याच्या शनिवार वाड्याच्या प्रांगणात झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणे दिल्याचा आरोप या सर्वांवर आहे. या भाषणांमुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमामध्ये जातीय दंगल उसळली. या दंगलीचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आयोजित करण्यात आलेल्या या एल्गार परिषदेला माओवाद्यांचा पाठिंबा होता. या नऊ आरोपींचा माओवाद्यांशी संबंध आहे.

टॅग्स :कोरेगाव-भीमा हिंसाचार