Join us  

कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस नव्या रूपात, प्रवास होणार आरामदायी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 4:43 AM

कोकणवासीयांत लोकप्रिय असलेली कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसचे रूपडे पालटण्यात येणार आहे.

मुंबई : कोकणवासीयांत लोकप्रिय असलेली कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसचे रूपडे पालटण्यात येणार आहे. डब्यांची वाढलेली लांबी-रुंदी, मोठे प्रवेशद्वार, सुधारित रचनेचे बेसीन आणि शौचालय अशा बदललेल्या रूपातील या कोकणकन्या, मांडवी मेल, एक्स्प्रेसमुळे आता प्रवास सुखकर तसेच अधिक आरामदायी होईल.

गाडी १०१११ व १०११२ मुंबई-मडगाव कोकणकन्या आणि १०१०३ आणि १०१०४ मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेसला १० जून ते ३१ ऑगस्टपर्यंत एलएचबी कोच लावण्यात येईल. या एक्स्प्रेसला २२ डबे असतील. एक्स्प्रेसची संरचना प्रथम, द्वितीय श्रेणी एक एसी डबा, द्वितीय श्रेणीचा एक डबा, तृतीय श्रेणीचे ४ एसी डबे, ११ स्लीपर क्लास, २ सामान्य डबे आणि एक पँट्री डबा अशी असेल.

१ सप्टेंबरपासून गाडी १०१११ व १०११२ मुंबई-मडगाव कोकणकन्या, १०१०३ आणि १०१०४ मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेसला कायमस्वरूपी नव्या प्रकारातील एलएचबी (लिके होल्फमन बुश) डबे जोडून कोकण रेल्वे मार्गावरून चालविण्यात येईल. या कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचा रंग निळ्याऐवजी आता लाल-करडा असा करण्यात येत आहे. या एक्स्प्रेसची संरचना प्रथम, द्वितीय श्रेणी एक एसी डबा, द्वितीय श्रेणीचा एक डबा, तृतीय श्रेणीचे ४ एसी डबे, ९ स्लीपर क्लास, ४ सामान्य डबे आणि एक पँट्री डबा अशी असेल.

पंजाब येथील कपुरथळातील रेल कोच फॅक्टरीत आधुनिक प्रकारातील डबे बनविण्यात येत आहेत. प्रवाशांना गाडीतून फिरण्यास जास्त जागा मिळेल. डब्यामधील बेसिन, टॉयलेट यांच्या रचनेत सुधारणा केली आहे. यासह दरवाजातील जुनी चिंचोळी जागा वाढविली आहे. त्यामुळे आता गाडीत चढताना तसेच उतरताना प्रवाशांना धक्काबुकी, गर्दीला सामोरे जावे लागणार नाही. या डब्यांची लांबी आणि रुंदी जास्त असल्याने प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल.

अपघात घडल्यास डबे उलटण्याची शक्यता कमीएलएचबी कोचची बांधणी स्टीलने करण्यात आली असून आतून अ‍ॅल्युमिनिअम धातूचा वापर करण्यात आला आहे. गाडीचे वजन कमी झाल्याने गाडीचा वेग वाढला आहे. या गाडीचा वेग १०० किमीवरून १३० किमीवर पोहोचला आहे. एलएचबी डबे अ‍ॅण्टी टेलिस्कोपिक पद्धतीचे असून साधारण ३९.५ टन वजनाचे आहेत. त्यामुळे अपघात घडल्यास डबे उलटण्याची शक्यता कमी आहे.

टॅग्स :रेल्वे