कोकणात लवकरच ‘पुस्तकांचे गाव’

By Admin | Updated: November 23, 2015 01:47 IST2015-11-23T01:47:25+5:302015-11-23T01:47:25+5:30

कोकणात लवकरच ‘पुस्तकांचे गाव’ ही योजना राबविण्यात येईल. मालगुंड येथे हे पुस्तकांचे गाव करण्यात येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी केले.

Konkan will soon be the 'Book of the Village' | कोकणात लवकरच ‘पुस्तकांचे गाव’

कोकणात लवकरच ‘पुस्तकांचे गाव’

मुंबई : कोकणात लवकरच ‘पुस्तकांचे गाव’ ही योजना राबविण्यात येईल. मालगुंड येथे हे पुस्तकांचे गाव करण्यात येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी केले. रविवारी राजा शिवाजी विद्यालयात कोमसापच्या १६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते.
या वेळी कर्णिक म्हणाले की, शासनातर्फे कोमसाप कोणतीच मदत स्वीकारत नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:हून भविष्यात संस्थेला मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. या सांगता समारंभात संमेलनाध्यक्षीय समारोप भाषणात जयंत पवार म्हणाले की, संमेलन हे केवळ भेटीगाठींसाठी नसते, हे या संमेलनातील समकालीन मुद्द्यावर झालेल्या विचारमंथनातून स्पष्ट झाले आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी शेलार यांची निवड झाल्यानंतर राजकीय पाठिंब्याने संमेलनावर दडपण येईल, अशी चर्चा होत होती.
मात्र ज्याप्रमाणे भयमुक्त वातावरणात कोमसापचे संमेलन पार पडले, त्याचप्रमाणे समाजातही भयमुक्त वातावरण निर्माण व्हावे एवढीच साहित्यिकांची मागणी आहे. भाजपाची राजकीय विचारसरणी व्यक्तिश: पटत नसली तरी आपण आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडले पाहिजे, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली. शिवाय, गेल्या काही काळात जागितिकीकरणामुळे मूल्यविहिनता आल्याचे सांगत मानवी करुणा जागरूक करण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे, असे आवाहनही या वेळी केले.
समारोप सोहळ्यात संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, ‘वाचणारा महाराष्ट्र’ या नावाने योजना सुरू करण्याचा विचार कोमसापने करावा. शिवाय, ग्रंथवितरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याबद्दलही सरकारशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, याकरिता उड्डाणपुलांखालील जागांचा विचार केला जावा, असे मत मांडले.
याप्रसंगी, विज्ञान साहित्यकार डॉ. बाळ फोंडके यांना कोमसापचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ‘कोकण साहित्य भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
मुंबई : या संमेलनात कोमसापच्या युवाशक्तीचा ‘जागर युवामनाचा’ हा एक वेगळा कार्यक्रम रसिकांची मने जिंकून गेला. कोमसाप पंचविशीत असताना त्या वयाच्याच युवकांचा त्यातील सक्रिय सहभाग हा विशेष लक्षणीय आहे.
यामिनी दळवी, सौरभ नाईक, किरण यादव, सायली जाधव, आदित्य दवणे, लीना दातार, शशिकांत कोळी, गौरी सावंत, रोहिणी ढवळे या तरुणांनी सादर केलेल्या कविता विशेष लक्षणीय ठरल्या. ई-बुक्सकडे तरुण पिढी का वळतेय याची जाणीव करून देणारे प्रा. दीपा ठाणेकर लिखित व सिद्देश आयरे दिग्दर्शित पथनाट्य, कोमसापवर कवी उमेश जाधव याने रचलेले स्तुतीपर गीत अशा स्वरूपाचे हे कार्यक्रम युवकांमधील कलाविष्कार प्रगट करणारे होते.
कोमसापच्या युवाशक्तीची ही मोट बांधली आहे ती प्रा. दीपा ठाणेकर यांनी. मुलांमध्ये काम करताना त्यांच्यातील संवेदनशीलता जाणून घेत, त्यांना पटेल, रुचेल अशा स्वरूपातील उपक्रम राबविण्याचे आव्हानात्मक कार्य त्यांनी कुशलतेने केल्यामुळेच युवाशक्तीचा उत्साह द्विगुणित झाला आहे. कोमसापच्या संमेलनाच्या निमित्ताने या युवाशक्तीने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी केली होती.

Web Title: Konkan will soon be the 'Book of the Village'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.