मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी
By Admin | Updated: August 13, 2015 00:15 IST2015-08-13T00:15:31+5:302015-08-13T00:15:31+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ब्रिजवर मधोमध कॉईलने भरलेला ट्रेलर सकाळी ७.४० वाजता बंद पडल्याने पनवेलकडून येणाऱ्या व पेणकडून जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी
पेण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ब्रिजवर मधोमध कॉईलने भरलेला ट्रेलर सकाळी ७.४० वाजता बंद पडल्याने पनवेलकडून येणाऱ्या व पेणकडून जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा खारपाडा ब्रिजजवळ लागल्या होत्या. त्यामुळे शालेय विद्यार्थी, कामगार यांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वाहतूक कोंडी सोडवण्यात वाहतूक पोलीस यंत्रणेला यश आले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सध्या गणेशमूर्ती वाहून नेणाऱ्या टेम्पो, पिकअप, मोठे ट्रक यांची वर्दळ सुरू आहे. हमरापूर जोहे गणेशमूर्तिकारांच्या पट्ट्यातून सध्या ही वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. बाप्पाचे आगमन अवघ्या २५ ते ३० दिवसांच्या अंतरावर येवून ठेपले असून महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवल्यास ही अवजड वाहनेच कारणीभूत ठरतात. त्याचा मनस्ताप दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी व कामगारवर्गाला होतो. बुधवारी सकाळीच खारपाडा ब्रिजवर अवजड कॉईलने भरलेला कळंबोलीहून येणारा ट्रेलर बंद पडल्याने सकाळी वाहतूक यंत्रणेला याचा फटका बसला. वाहतूक पोलिसांना तब्बल अर्धा तास उशिरा माहिती मिळाल्याने ८.३० वाजता वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले. बंद ट्रेलर ब्रिजवरून खेचून काढण्यास तब्बल ३० ते ४० मिनिटे लागली. तोपर्यंत ब्रिजच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती.