Join us

‘तिची’ अवयवदानाची इच्छा कुटुंबीयांकडून पूर्ण; किडन्या, फुप्फुस, डोळे दान, पाच जणांना जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 06:48 IST

अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या पाच रुग्णांना जीवनदान मिळा

मुंबई : माहीम येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय कोमल सावला यांना मंगळवारी घरी चक्कर आल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना शनिवारी मेंदूमृत घोषित केले. कोमल यांची अवयवदान करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्रितपणे रुग्णालयाला अवयवदान करण्याबाबत संमती दिली. त्यानुसार कोमल यांच्या दोन किडन्या, यकृत, फुप्फुस, छोटे आतडे आणि डोळे दान करण्यात आले. त्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या पाच रुग्णांना जीवनदान मिळाले. दरम्यान, मुंबई विभागातील हे २०वे अवयवदान आहे. 

कोमल या डिझायनर असून, मंगळवारी त्यांना घरी चक्कर आल्याने हिंदुजा रुग्णालय दाखल करण्यात आले. एमआरआय चाचणीत त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान करून उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी डॉक्टरांनी त्यांना मेंदूमृत घोषित केले. 

कोमल यांचा लहान भाऊ जय सावला यांनी सांगितले की, ‘माझ्या बहिणीने तिच्या अवयवदानाविषयी कुटुंबातील सदस्यांना सांगितले होते. त्यामुळे माझे आई-बाबा आणि कुटुंबातील सदस्यांनी या अवयवदानासाठी संमती दर्शविली. त्यामुळे कोमल आज आमच्यासोबत शारीरिकदृष्ट्या सोबत नसली तरी अवयवरूपी ती आज जिवंत आहे. तिच्या अवयवांमुळे आज पाच रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. अवयवांसाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. त्या रुग्णांना अवयव वेळेत मिळाल्यास दुसरे आयुष्य सर्वसामान्यांसारखे जगता येते.’

प्रतीक्षा यादी वाढती 

राज्यात गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी प्रत्येक महिन्याला वाढत आहे. 

एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवांची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे अवयवदान जनजागृतीची गरज आहे. 

वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. 

टॅग्स :अवयव दानमुंबई